दुधाच्या दरासंबंधी सरकारकडे आपल्याला गाऱहाणे मांडावे लागेल. जर आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर रस्त्यावर यावे लागेल. ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. हे प्रश्न लगेच सुटणार नाहीत. त्यासाठी शेतकऱयांनी आम्हाला चार-सहा महिने दिले पाहिजेत. या कालावधीत मला सरकार बदलायचे आहे. सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजे ते निर्णय घेता येणार नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
इंदापूर तालुक्यातील दुष्काळी दौऱयात शरद पवार यांनी शेतकऱयांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, दहा वर्षे माझ्याकडे पेंद्रात कृषी खाते होते. शेतकऱयांची कर्जमाफी कोणी केली, शेतीमालाचे भाव कोणी वाढवले, साखरेचे-उसाचे भाव कोणी वाढवले, असे सवाल करतानाच सत्तेचा वापर हा ज्यांनी सत्ता दिली, त्यांच्यासाठी करायचा असतो. शेतकऱयाच्या बाबतीत सरकारला कितपत रस आहे, हे मला तरी समजले नाही. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना आम्ही विनंती करू, जर हे घडलं नाही तर मला चार-सहा महिन्यांनंतर हे निर्णय घेण्याचे, धोरण ठरवण्याचे अधिकार तुमच्या लोकांच्या हातात द्यायचे आहेत. आम्हाला विधानसभा जिंकायचीय आणि राज्य हातात घ्यायचे आहे. यासाठी तुमची साथ हवी आहे, असे आवाहन त्यांनी केले.