पवईतील जय भीम नगर झोपडपट्टी रिकामी करण्यासाठी दबाव आणणाऱया बिल्डर आणि त्यांना साथ देऊन रहिवाशांना सक्तीने बेघर करणाऱया, घरात घुसून मारहाण करणाऱया एस वॉर्डमधील पालिका आणि पवई पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांविरोधात एससी-एसटी कायद्या अंतर्गत अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेसने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन केली. शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांच्यासह जय भीम नगरचे रहिवाशी उपस्थित होते.
पवईत बिल्डरच्या सांगण्यावरून तीन पिढय़ांपासून 14 एकर जमिनीवर राहणाऱया जय भीम नगर झोपडपट्टीतील रहिवाशांना सक्तीने घराबाहेर काढण्यात आले. या वेळी त्यांना पवई पोलिसांनी काठीने अमानुष पद्धतीने मारहाणही केली आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. बिल्डरच्या सांगण्यावरून पालिका आणि पोलीस अधिकाऱयांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे संबंधितांवर अॅस्ट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा, पालिका कर्मचारी-पोलिसांना निलंबित करा, याची न्यायालयाच्या वर्तमान न्यायाधीशांकडून चौकशी केली जावी, बेघर झालेल्या कुटुंबांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.