‘भोपाळ’ पार्ट – 2, अवघ्या 23 दिवसांत डोंबिवली स्फोटांनी पुन्हा हादरली; इंडो-अमाईन, मालदे कंपनी भस्मसात

डोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान पंपनीत रिअॅक्टरचा स्फोट होऊन 17 कामगारांचा बळी गेला तर 64 जण गंभीर जखमी झाले. या घटनेची जखम भळभळती असतानाच अवघ्या 23 दिवसांत आज डोंबिवली स्फोटांनी पुन्हा हादरली आणि ‘भोपाळ’ पार्ट टूचा प्रत्यय आला. सकाळी दहाच्या सुमारास इंडो-अमाईन या कंपनीत भीषण आग लागून धुराचे उंचच उंच लोट उठले. या आगीची तीव्रता एवढी जबरदस्त होती की त्याची धग बाजूच्या मालदे कंपनीलाही बसली. एकामागोमाग एक होणारे स्फोटांचे आवाज आणि आगीचे लोट यामुळे परिसरातील हजारो रहिवाशांचा जीव घुसमटला. केवळ देवाचीच कृपा म्हणून 20हून अधिक कामगार बालबाल बचावले असून या दुर्घटनेत इंडो-अमाईन व मालदे या दोन्ही कंपन्या भस्मसात झाल्या आहेत. दरम्यान अग्निशमन दलाने तब्बल आठ तास झुंज देत ही आग आटोक्यात आणली. एमआयडीसीमध्ये वारंवार घडत असलेल्या आगीमुळे लाखो डोंबिवलीकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आणखी किती बळी घेतल्यानंतर सरकारला जाग येणार, असा संतप्त सवाल विचारण्यात येत आहे.

डोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान कंपनीमध्ये 23 मे रोजी बॉयलरचा स्फोट होऊन भीषण अग्नितांडव घडले होते. त्यानंतर मिंधे सरकारने घातक केमिकल कारखाने अन्यत्र हलवण्याची घोषणा केली. काही कंपन्यांना क्लोजर नोटिसादेखील बजावल्या. मात्र आगीची झळ  बसलेल्या रहिवाशांच्या वेदनांची धग अजूनही कायम असतानाच आज एमआयडीसी फेज-2मध्ये अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून कार्यरत असलेल्या इंडो अमाईन कंपनीत आज सकाळी  शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि काही क्षणातच ही आग पसरायला सुरुवात झाली. कंपनीत सुमारे दहा कामगार काम करीत होते. या कामगारांनी मिळेल त्या साधनांचा उपयोग करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची धग वाढत चालल्याचे लक्षात येताच कामगारांनी जिवाच्या आकांताने बाहेर धूम ठोकली. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

अभिनव शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांची घबराट

आगीच्या घटनेपासून केवळ दोनशे मीटर अंतरावर असलेली अभिनव शाळा स्फोटानी चांगलीच हादरून गेली. गगनाला भिडणारा धूर.. सैरावैरा पळणारे रहिवाशी बघून शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकदेखील भयभीत झाले. ही घटना घडली तेव्हा पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू होते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी तातडीने पालकांना फोन करून बोलावून घेतले तसेच शाळाही लगेच सोडली. त्यामुळे सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा जीव वाचला.

…तर मोठी जीवितहानी झाली असती

इंडो अमाईन या कंपनीत अॅग्रो केमिकलचे उत्पादन केले जाते. आग लागल्यानंतर धुराचे गगनाला भिडणारे लोट पाहून रहिवाशांची एकच पळापळ झाली. याच कंपनीला लागून मालदे ही पकंनी आहे. ही आग एवढी भीषण होती की, मालदे कंपनीही ज्वालांनी वेढली गेली आणि काही मिनिटांतच ती कंपनीदेखील जळून खाक झाली. आतमध्ये असलेले दहा ते बारा कामगार प्रसंगावधान राखून सटकल्याने त्यांचा जीव वाचला अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. दरम्यान अग्निशमन दलाच्या बारा बंबांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. एनडीआरएफची टीमही तातडीने घटनास्थळी दाखल झाली.