गोलंदाजांचा विजय असो!

>>मंगेश वरवडेकर

टी-20 क्रिकेट सुरू झाल्यापासून मला गोलंदाज हा हिंदी चित्रपटातल्या व्हिलनसारखाच वाटू लागलाय. ज्याला हीरो फक्त चोप चोप चोपायचा. कधी-कधी व्हिलनही हीरोला दोन-चार हाणून द्यायचा, पण ती गोष्ट वेगळी. मात्र कधी-कधी व्हिलन तगडा असायचा तेव्हा तो हीरोलाही मारायचा. पण शेवटी विजय हीरोचाच व्हायचा. पण आता तेच गोलंदाज टी-20 वर्ल्ड कपमध्ये हीरो ठरताहेत. म्हणून सारेच म्हणताहेत वक्त हमारा है…

खरं सांगायचं तर टी-20 क्रिकेट म्हणजे षटकार-चौकारांचा वर्षाव… टी-20 क्रिकेट म्हणजे गोलंदाजांची धुलाई… टी-20 म्हणजे क्षणाक्षणाला वळण घेणारा थरार… टी-20 म्हणजे फलंदाजांची दादागिरी… आणि फलंदाजांसाठी नेहमीच दसरा-दिवाळी…  टी-20 क्रिकेटचे असेच काहीसे चित्र क्रिकेटप्रेमींच्या मनात अनेक वर्षे कोरले गेलेय. पण या कोरलेल्या शिल्पावर अमेरिकेत गोलंदाजांनी छिन्नी-हातोडीने असे काही घाव केलेत की सारे चित्रच छिन्नविच्छिन्न झालेय.

टी-20 वर्ल्ड कपच्या आधी हिंदुस्थानात आयपीएलचा थरार रंगला होता. त्यात सहजगत्या अडीचशे धावांचा टप्पा गाठला जात होता आणि त्या धावांचा यशस्वीपणे पाठलागही केला जात होता. एवढेच नव्हे तर सहा चेंडूंत 25 असो किंवा 30 धावांचे आव्हानही गाठले जायचे. षटकारांच्या आतषबाजीने ठोकले जात होते. बोले तो आयपीएलच्या इम्पॅक्ट प्लेअरने टी-20 चे एक वेगळे चित्रच सर्वांसमोर उभे केले होते. फलंदाजांचा झंझावात पाहून ते कसाईच वाटायचे. जणू ते हातात बॅट नव्हे तर सुरा घेत गोलंदाजांची बकऱयासारखी कत्तल करत असावेत. आयपीएलमध्ये गोलंदाजांचा अक्षरशः बकरा केला होता. गोलंदाजांची लक्तरे वेशीला टांगली जायची.

पण टी-20 वर्ल्ड कपमध्ये काळ बदललाय. आता गोलंदाजांनी चक्क खाटीकाचे रूप घेतलेय आणि त्यांना पाहून फलंदाजांचा अक्षरशः थरकाप उडतोय. अमेरिका आणि विंडीजमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपने एक वेगळाच थरार अवघ्या जगाला दाखवलाय. ज्या आयपीएलमध्ये 200 धावा करणारा संघही सहज हरत होता. पण टी-20 वर्ल्ड कपमध्ये 100 धावा करणारा संघही जिंकतोय. शेवटच्या षटकात दहा धावांचे माफक आव्हानही फलंदाजांना 30 धावांपेक्षा मोठे वाटू लागलेय. आपण टी-20 क्रिकेटच पाहतोय ना? स्वतःलाच चिमटे काढून खात्री करावी लागतेय.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघाचा सहभाग केल्यामुळे आयसीसीवर साऱयांनीच टीकेचे आसुड ओढले होते, पण आता त्याच नवख्या संघांनी वर्ल्ड कपचा थरार द्विगुणीत केला आहे. जेव्हा वर्ल्ड कपचा कार्यक्रम जाहीर झाला. पाच संघांचे चार गट पाडले गेले तेव्हा एक संघ सोडला तर ‘अ’ गटातून हिंदुस्थान-पाकिस्तान, ‘ब’ गटातून ऑस्ट्रेलिया-इंग्लंड, ‘क’ गटातून वेस्ट इंडीज-न्यूझीलंड आणि ‘ड’ गटातून दक्षिण आफ्रिका असे सात संघांचे सुपर-एट स्थान पक्के मानले जात होते. आता वर्ल्ड कपच्या 40 साखळी सामन्यांपैकी 22 सामने झालेत. या सामन्यानंतर गुणतालिका पाहिली तर प्रत्येक गटातून एक वेगळाच संघ सुपर–एटची दावेदारी करतोय. मग ‘अ’ गटातून अमेरिका, ‘ब’ गटातून स्कॉटलंड, ‘क’ गटातून अफगाणिस्तान आणि ‘ड’ गटातून नेदरलॅण्डस् हे चार संघ सुपर-एटच्या ट्रकवर आहेत. ही सारी किमया केवळ गोलंदाजांच्या भेदक माऱयामुळे साधली गेलीय. या परिवर्तनाला अमेरिकेतल्या रेडीमेड म्हणजेच ड्रॉप इन खेळपट्टय़ाही तितक्याच जबाबदार आहेत. टी-20 क्रिकेटने अमेरिकेत अशी काय कूस बदललीय की गोलंदाज फलंदाजांना बॅटसुद्धा फिरवायला देत नाहीत. गोलंदाजांची इतकी दहशत झालीय की, फलंदाज कोणीही असो पहिल्या षटकात शून्यावर बाद झालाच म्हणून समजा. गोलंदाजांची इतकी दहशत आजवर कोणत्याही आयसीसी स्पर्धेत पाहायला मिळाली नव्हती. जिथे गेल्या 22 सामन्यांत केवळ 18 अर्धशतके केली आहेत, पण अद्याप एकाही फलंदाजाला शतक ठोकता आलेले नाही. मात्र गोलंदाजांनी 22 वेळा तीनपेक्षा अधिक विकेट टिपलेत. त्यात आठवेळा चार आणि त्यापेक्षा अधिक विकेट टिपले गेलेत. तसेच दोनवेळा पाच विकेट टिपण्याचा भीमपराक्रम फझलहक फारुकी आणि अकिल होसेनने करून दाखवलाय. यावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की, आतापर्यंत वर्ल्ड कपवर गोलदाजांनीच राज्य गाजवलेय. त्यामुळे आजवर टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजांचाच विजय होत असला तरी या वर्ल्ड कपमध्ये गोलंदाजांचाच विजय झाला आहे. त्यांच्या या विजयामुळे एक वेगळय़ा थरारक क्रिकेटचा अवघ्या जगाने मनमुराद आनंद घेतलाय आणि पुढील 17 दिवसही घेतील.