माळशेज घाटामध्ये सुशोभिकरणाच्या नावाखाली नको तिथे कामं सुरू आहेत. ठेकेदाराकडून ब्लास्टिंग करण्यात येत असल्याने घाटातील काही भाग कमकुवत झाला आहे. पावसाळ्यामध्ये अशा भागात कायम दरड कोसळण्याचा धोका असतो. मंगळवारी याच माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळली आणि दोघांचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुलुंड येथील रहिवासी भालेकर कुटुंब रिक्षाने माळशेज घाटातून प्रवास करत होते. याचवेळी घाटातील गणपती मंदिरालगत असणारी दरड रिक्षावर कोसळली. यात रिक्षाचाक राहुल भालेकर (वय – 30) आणि त्याचा पुतण्या स्वयंम भालेकर (वय – 7) यांचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षातील अन्य तिघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.