जम्मू-कश्मीर पोलिसांनी रियासी जिल्ह्यात वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचे स्केच जारी केले आहे. त्याची माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीसही पोलिसांनी जाहीर केले.
तीन दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना जम्मू-कश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता. शिवखोरी मंदिराहून कटरा जाणाऱ्या 53 सीटवाल्या बसवर पोनी भागातील तेरयाथ गावाजवळ दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. यानंतर ही बस खोल दरीत कोसळली होती. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला होता, तर 41 जण जखमी झाले होते.
जम्मू-कश्मीर पोलिसांच्या प्रवक्त्यांनी माहिती देताना सांगितले की, रियासी पोलिसांनी पोनी भागात भाविकांच्या बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एकाचे स्केच जारी केले असून त्याच्याबाबत माहिती देणाऱ्याला 20 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे स्केच बनविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
.नागरिकांनी एसएसपी रियासी – 9205571332, 9419113159, डिप्टी एसपी एचक्यू रियासी – 9419133499, एसएचओ पोनी – 7051003214, एसएचओ रनसू – 7051003213 आणि पीसीआर रियासी – 9622856295 या नंबरवर संपर्क करून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.