कोल्हापूर-पन्हाळा रस्ता बनतोय धोकादायक; भेगांमुळे रस्ता खचू लागला; वाहनधारकांचा जीव धोक्यात, ‘सार्वजनिक बांधकाम’चे दुर्लक्ष

नेहमी वाहतुकीच्या वर्दळीने गजबजलेल्या कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील कोल्हापुरातील शिवाजी पूल ते केर्ली हा सात ते आठ कि.मी.चा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्त्यावर मोठमोठय़ा भेगा पडल्या असून, ठिकठिकाणी रस्ता खचत चालल्याचे दिसून येत आहे.

अगोदरच या मार्गावर दररोज लहान-मोठय़ा अपघातांच्या घटना घडत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरणार असल्याने कोणाचातरी नाहक बळी जाण्यापूर्वी हा मार्ग तातडीने दुरुस्त करण्याची सुबुद्धी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना कधी येणार? असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.

तळकोकणला जोडणारा कोल्हापूर-रत्नागिरी हा राष्ट्रीय मार्ग असून, पन्हाळा, विशाळगडासह कोकण भागात जाणाऱया व्यावसायिक, नोकरदार, पर्यटक अशा वाहनधारकांची सतत वर्दळ असते. अगोदरच अरुंद रस्ता, वाहनांची वर्दळ आणि अपघातांची संख्या पाहता, या मार्गाचे रुंदीकरण करणे आवश्यक असताना, आता मोठमोठय़ा भेगा आणि रस्ता खचत चालल्याचे दिसून येत आहे. महापुरात या रस्त्यावर केर्ली फाटा येथे पाणी येऊन मार्ग बंद होतो. पावसामुळे या भेगांत पाणी गेल्यास हा मार्ग वाहनधारकासाठी अत्यंत धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे सध्या पावसाने अधिक जोर धरण्यापूर्वी संबंधित बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे.

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या 134 कि.मी.च्या चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारने दोन हजार 114 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, याचे काम जलद गतीने सुरू आहे. पूर्वी हा महामार्ग कोल्हापूर शहरातून जात असल्याने, पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलापर्यंत रस्त्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होती; पण आता हा महामार्ग केर्ली येथून बायपास करून, केर्ली ते बंगळुरू महामार्गावर शिये-चोकाक असा नेल्यामुळे केर्ली ते शिवाजी पूल या अंतराच्या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी कोणाची? हा प्रश्नही यानिमित्ताने दिसून येत आहे.