सोलापूर जिह्यात आठवडाभरापासून दमदार पाऊस पडत आहे. या आठवडय़ात सरासरी 150.5 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. कित्येक वर्षांनंतर यंदाच्या वर्षी जूनमध्ये चांगला पाऊस होत आहे. हा पाऊस खरीप पेरणीसाठी उपयुक्त ठरला आहे.
सोलापूर शहर व जिह्यात आठवडाभरापासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. जिह्यात सरासरी 150.5 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून, दुष्काळी तालुका समजल्या जाणाऱया माळशिरस तालुक्यात 113 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. सूर्यदर्शन नाही. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. शहरातील सखल भागातील घरे, वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. सतत पडणाऱया पावसामुळे रूपाभवानी मंदिर परिसरात जवळपास चार फूट पाणी साचले असून, निराळेवस्ती ते अरविंदधाम जाणारा रस्ता खचला आहे. मडकीवस्ती जवळील नाला पावसाच्या पाण्यामुळे ओव्हरफ्लो झाला असून, या नाल्यावरील वाहतूक बंद झाली आहे. याशिवाय मोहोळ तालुक्यातील मलिक पेठ येथे रेल्वेच्या बोगद्यामध्ये जवळपास आठ ते दहा फूट पाणी तुंबल्याने गावकऱयांचा संपर्क तुटला आहे. सोलापूरसह अक्कलकोट, पंढरपूर, सांगोला या तालुक्यांतही पाऊस झाला आहे.
चाऱयाचा प्रश्न सुटला
सोलापूर जिह्यात गेल्या 7-8 वर्षांतील यंदाचा पाऊस चांगला झाला असून, खरीप पेरणीसाठी उपयुक्त ठरला आहे. शेतीची कामे सुरू झाली असून, शेतकरी बी-बियाणे खते खरेदी करत आहेत. या पावसामुळे जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
जिह्यात रेड अलर्ट
राज्यासह सोलापूर जिह्यातही मान्सून सक्रिय झाला आहे. अनेक भागात मुसळधार व अति मुसळधार पाऊस पडत आहे. वीज पडून जिह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिह्यात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून, पंढरपूर, माढा, बार्शी या भागात अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
तालुकानिहाय पाऊस ः उत्तर सोलापूर – 115.9 मि.मी., बार्शी- 107.3, मोहोळ- 91.1, दक्षिण सोलापूर- 98.8, अक्कलकोट- 102.3, माढा- 97.7, करमाळा- 99.2, पंढरपूर- 104, सांगोला- 101.9, माळशिरस – 113, मंगळवेढा- 89.1.