एटीएसची कारवाई; घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक, दोघांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केले

बेकायदेशीरपणे घुसखोरी करून हिंदुस्थानात वास्तव्य करणारे तसेच इथेच राहून बोगस कागदपत्रांच्या आधारे पारपत्र बनविणाऱया चार बांगलादेशी नागरिकांना दहशतवादविरोधी पथकाने बेडय़ा ठोकल्या आहेत. गंभीर म्हणजे, त्यातील दोघांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानदेखील केल्याचे समोर आले आहे.

एक बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचे कळताच एटीएसच्या जुहू युनिटने त्याला उचलले. तपासात असे निदर्शनास आले की, बांगलादेशी नागरिकांवर हिंदुस्थानात घुसखोरी केल्याबाबत कारवाई केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर ते जामिनावर सुटतात. त्यानंतर ते बोगस कागदपत्रांच्या आधारे पारपत्र बनवून घेतात. त्यामुळे एटीएसच्या जुहू युनिटने पकडलेल्या बांगलादेशीकडे कसून चौकशी करत आणखी तिघा घुसखोरांना पकडले. रियाज शेख (33), सुलतान शेख (54), इब्राहिम शेख (46) आणि फारुख शेख (39) अशी अटक केलेल्या घुसखोरांची नावे आहेत. अंधेरीत राहणारा रियाज इलेक्ट्रिशियनचे, मालाडमध्ये राहणारा सुलतान रिक्षाचालक, माहुल गावात राहणारा इब्राहिम भाजीविक्रीचे काम करत होता.

बोटावरील शाईने मतदानाचे गुपित उघड

एटीएसने अटक केलेल्या चौघांपैकी दोघांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचे समोर आले आहे. एटीएसने पहिल्या आरोपीला पकडले आणि त्याला चौकशीसाठी कार्यालयात आणले तेव्हा त्याच्या बोटावर मतदान केल्याची शाई होती. त्यामुळे त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने मतदान केल्याचे मान्य केले. त्यानंतर पकडलेल्या दुसऱया आरोपीच्या बोटावरदेखील शाई लावलेली आढळून आली.

घुसखोर बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे हिंदुस्थानात वास्तव्यास असून त्यांच्याविरोधात मुंबईत गुन्हे दाखल आहेत. गंभीर म्हणजे, त्यांनी ते गुजरातच्या सुरतचे रहिवाशी असल्याचे पुरावे बनवले आहेत. शिवाय बोगस कागदपत्रांच्या आधारे त्यांनी सुरतमध्ये पासपोर्ट बनवले असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

काही पाहिजे (वॉण्टेड) घुसखोर बांगलादेशींनी बोगस कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवले असल्याचे समोर आले असून त्यातील एकजण सौदी अरेबियामध्ये नोकरीसाठी गेल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.