पुनर्विकासाच्या नावाखाली वरळीतील जनता कॉलनीतील रहिवाशांना विकासक घरे रिकामी करण्यासाठी धमकावत आहे. बिल्डरकडे एनओसी आहे की नाही, नौदल आणि बीपीटीकडून एनओसी आहे की नाही, संरक्षण विभागाची या प्रकल्पाला परवानगी आहे की नाही, याची शहानिशा झाली पाहिजे. पुनर्विकासाच्या नावाखाली लोकांना घराबाहेर काढण्याचा कट रचला जात असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
वरळीतील विविध समस्यांबाबत आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी वरळीकरांशी संवाद साधला. यावेळी वरळीतील जनता कॉलनीमधील रहिवाशांनी पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डर धमकावत असून याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे निवेदन आदित्य ठाकरे यांना जनता कॉलनीतील रहिवाशांनी दिले. त्यावर आदित्य ठाकरे यांना सक्तीचा पुनर्विकास खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले. आदित्य ठाकरे म्हणाले, पुनर्विकासाला आमचा विरोध नाही, लोकांचा विरोध नाही. मात्र, पुनर्विकास करताना बिल्डरकडे योग्य ती कागदपत्रे असायला हवीत. ती असतील तर बिल्डरने पुनर्विकास करावा. पण पुनर्विकासाच्या नावाखाली लोकांना घराबाहेर काढले जात आहे. पुनर्विकास करताना लोकांना राहायला कुठे देणार ते माहीत नाही, हा प्रकल्प पूर्ण कधी करणार, त्यांना परत कधी आणणार हे माहीत नसेल तर असा विकास चालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार सुनील शिंदे, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
मान्सूनपूर्व कामे अपूर्ण!
मुंबईच्या अनेक समस्या ‘जैसे थे’च आहेत. मान्सूनपूर्व कामे अपूर्ण आहेत. काही ठिकाणी पंप लावलेले नाहीत, रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. वरळीत आणि मुंबईतही हीच परिस्थिती आहे. हा मुद्दा मी अधिवेशनात मांडणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.