अनेक पिढय़ांचा संघर्ष, सेवा आणि बलिदानाच्या परंपरेला घराणेशाही म्हणणारे आपल्या ‘सरकारी परिवारा’ला सत्तेचा वारसा वाटत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान मोदींसह भाजपच्या नेत्यांनी घराणेशाहीच्या मुद्दय़ावरून रान उठवले होते. मात्र, त्याच मोदींच्या नेतृत्वात केंद्रात स्थापन करण्यात आलेल्या एनडीए सरकारच्या कॅबिनेटमध्ये राजकीय वारसा असलेल्या नेत्यांची मुले, पत्नी, सून, जावई, नातू यांची वर्णी लावण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींच्या कॅबिनेटमधील अशा 20 जणांची यादीच सोशल मीडियावर जाहीर करत हे मंत्रिमंडळ नव्हे, तर एनडीएचे ‘परिवार मंडळ’ आहे, अशा शब्दांत मोदींवर थेट हल्ला चढवला आहे.
भाजपकडून कॉँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप सातत्याने केला जातो. राहुल गांधी याचा शहजादा, युवराज असा उल्लेख करून घराणेशाहीच्या मुद्दय़ावरून कॉँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान केला. पण, मोदींच्या ‘कथनी आणि करणी’मधील फरकाचा पर्दाफाशच राहुल गांधी यांनी आज केला. एनडीए सरकारमधील मंत्र्यांची यादीच त्यांच्या घराणेशाहीचा उल्लेख करत जाहीर केली. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पियूष गोयल, धमेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजेजू, रक्षा खडसे यांच्याह वीसजणांची नावे आहेत.
असे आहे परिवार मंडळ
जे. पी. नड्डाः माजी खासदार व मंत्री जयश्री बॅनर्जी यांचे जावई.
कुमारस्वामीः माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र.
ज्योतिरादित्य शिंदेः माजी पेंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांचे पुत्र.
किरेन रिजिजूः अरुणाचल प्रदेशातील पहिले हंगामी अध्यक्ष रिंचिन खारू यांचे पुत्र.
रक्षा खडसेः महाराष्ट्रातील आमदार व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सूनबाई.
जयंत चौधरीः माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे नातू.
चिराग पासवानः माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र.
कमलेश पासवानः उत्तर प्रदेशातील लोकसभेचे उमेदवार ओम प्रकाश पासवान यांचे पुत्र.
रामनाथ ठाकूरः बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र.
राम मोहन नायडूः माजी केंद्रीय मंत्री येरेन नायडू यांचे पुत्र.
जितीन प्रसादः उत्तर प्रदेशातील माजी खासदार जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र.
शंतनू ठाकूरः पश्चिम बंगालमधील माजी मंत्री मंजूल कृष्णा ठाकूर यांचे पुत्र.
राव इंद्रजित सिंहः हरयाणाचे माजी मुख्यमंत्री राव वीरेंद्र सिंह यांचे पुत्र.
पियूष गोयलः माजी केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल यांचे पुत्र
कीर्ती वर्धन सिंहः उत्तर प्रदेशातील माजी मंत्री महाराज आनंद सिंह यांचे पुत्र.
वीरेंद्र कुमार खाटीकः मध्य प्रदेशातील माजी मंत्री गौरीशंकर सेजवार यांचे मेहुणे.
रवनीतसिंह बिट्टूः पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंत सिंग यांचे नातू
धर्मेंद्र प्रधानः माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रधान यांचे पुत्र.
अनुप्रिया पटेलः अपना दल आणि बहुजन समाज पक्षाचे संस्थापक सदस्य सोनेलाल पटेल यांच्या कन्या.
अनुप्रिया देवीः बिहारमधील माजी आमदार रमेश प्रसाद यादव यांच्या पत्नी.
‘मोदी का परिवार’ची नौटंकी बंद
लोकसभेच्या रणधुमाळीत मोदीभक्तांनी ‘मोदी का परिवार’ची नौटंकी लावली होती. संपूर्ण देश माझा परिवार आहे, असे मोदी म्हणाल्यानंतर सोशल मीडिया प्रोफाईलवर मोदीभक्तांनी आपल्या नावापुढे ‘मोदी का परिवार’ जोडला. आता निवडणुका संपताच मोदींचा सूर बदलला आहे. आता तुम्ही तुमच्या प्रोफाईलमधून मोदी का परिवार हटवू शकता, असे आवाहन आज मोदींनी केले.