आशियाई क्रीडा स्पर्धेतील कास्यपदक विजेता धावपटू गुलवीर सिंहने पोर्टलॅण्ड ट्रक फेस्टिव्हलमध्ये पाच हजार मीटर शर्यतीत आपल्याच देशाच्या अविनाश साबळेचा विक्रम मोडीत काढत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्तापित केला. गुलबीरने या शर्यतीत 13 मिनिटे 18.32 सेपंद वेळेसह रौप्यपदकाची कमाई केली.
मराठमोळय़ा अविनाश साबळेने गतवर्षी लॉस एंजिल्समध्ये नोंदविलेला 13 मिनिटे 19.30 सेपंद वेळेचा राष्ट्रीय विक्रम गुलवीर सिंहने मोडला. सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेल्या अमेरिकेच्या डिलन जॅकब्सने 13 मिनिटे 18.18 सेपंदांत ही शर्यत पूर्ण केली. हिंदुस्थानचा कार्तिक कुमार (13 मिनिटे 41.07 सेपंद) या शर्यतीत 17 व्या स्थानी राहिला, तर अविनाश साबळेला शर्यत पूर्ण करण्यात अपयश आले. आता गुलवीरच्या नावावर दहा हजार मीटर व पाच हजार मीटर या दोन्ही शर्यतीतील राष्ट्रीय विक्रम जमा झाले आहेत. त्याने गतवर्षी हांग्झोऊ आशियाई स्पर्धेत 28 मिनिटे 17.21 सेपंद वेळेसह 10 हजार मीटर शर्यतीत कास्यपदक जिंकत नवा राष्ट्रीय विक्रम केला होता.
याचबरोबर पुरुषांच्या पाच हजार मीटर हाय परफॉमेन्स शर्यतीत हिंदुस्थानच्या अभिषेक पालने 13 मिनिटे 41.57 सेपंद वेळेसह कास्यपदकाची कमाई केली. ‘पोर्टलॅण्ड ट्रक फेस्टिव्हल’ ही अमेरिकेतील एक मानाची ट्रक स्पर्धा असून यात अनेक ऑलिम्पिक पदकविजेते, जागतिक विक्रमवीर, राष्ट्रीय विक्रमवीर व ऑलिम्पियन खेळाडू सहभागी होत असतात.