टी-20 विश्वचषकात टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली आहे. रविवारी झालेल्या या सामन्यात हिंदुस्थानने पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला. रंजक झालेल्या या सामन्यात अखेरच्या षटकापर्यंत कोण जिंकणार याबाबत उत्कंठा शिगेला लागली होती. अर्शदीप सिंगने शेवटच्या षटटात जबरदस्त गोलंदाजी करत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र हा सामना सुरू असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने शीख समुदायाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं.
कामरानच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कामरान अकमल म्हणाला, पाहा अर्शदीप सिंगला शेवटची ओव्हर टाकायची आहे. तुम्हाला माहित आहे की 12 वाजले आहेत. यानंतर कामरान हसायला लागतो. त्याचे सहकारी तज्ञ म्हणतात, कोणत्याही शिखाला 12 वाजता गोलंदाजी करायला देऊ नये.
कामरानच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग भडकला असून त्याने कामरान अकमलवर जोरदार टीका केली आहे. हरभजन सिंग म्हणाला, कामरान अकमल, तुझे घाणेरडे तोंड उघडण्यापूर्वी शिखांचा इतिहास जाणून घ्या. आम्ही शीखांनी तुमच्या माता-भगिनींना आक्रमणकर्त्यांपासून वाचवले होते, त्यावेळी शिख नसते तर तुमचे 12 वाजले असते. त्यामुळे अशी वक्तव्ये करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असे हरभजन सिंगने फटकारले आहे.
I deeply regret my recent comments and sincerely apologize to @harbhajan_singh and the Sikh community. My words were inappropriate and disrespectful. I have the utmost respect for Sikhs all over the world and never intended to hurt anyone. I am truly sorry. #Respect #Apology
— Kamran Akmal (@KamiAkmal23) June 10, 2024
त्यानंतर आता कामरान अकमलने त्याच्या वक्तव्याबाबत शीख समुदायाची जाहीर माफी मागितली आहे. ”मी केलेल्या माझ्या त्या वक्तव्याबाबत मला खंत वाटत असून मी त्यासाठी हरभजन सिंग व शीख समुदायाची माफी मागतो. माझे शब्द चुकीचे व अपमानकारक होते. मला शीख समुदायाबाबत खूप आदर आहे व त्यांच्या भावना दुखवायचा माझा कोणताही हेतू नव्हता. त्यासाठी मी मनापासून माफी मागतो”, असे कामरान अकमलने ट्विट केले आहे.