‘कोस्टल रोड’वर मरीन ड्राइव्हवरून वाहतूक सुरू, वरळीपर्यंतचा 40 मिनिटांचा प्रवास 9 मिनिटांत

कोस्टल रोड प्रकल्पाचा दुसरा बोगदाही आजपासून सेवेत आला आहे. त्यामुळे आता कोस्टल रोडवरून वरळीपर्यंतचा 40 मिनिटांचा प्रवास अवघ्या आठ ते नऊ मिनिटांत होणार आहे. हा मार्ग सोमवार ते शुक्रवार असे आठवडय़ाचे पाच दिवस सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत वाहनचालकांसाठी खुला राहणार आहे, तर उर्वरित वेळेत कोस्टल रोडचे शिल्लक 10 टक्के काम पूर्ण करण्यात येणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील आणि पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेला ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ सागरी मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सी लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधला आहे. यासाठी रस्त्याच्या बांधकामात 2.072 किमीचे दोन महाकाय बोगदे जमिनीखाली 70 मीटर खाली खोदण्यात आले आहेत. यातील एक बोगदा 12 मार्च रोजी वरळी ते मरीन ड्राइव्ह तर आज मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत 6.25 किमीचा मार्गही सुरू झाला आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
अशी सुटणार वाहतूककोंडी

नवा बोगदा सेवेत आल्यामुळे अमरसन्स उद्यान व हाजी अली येथील आंतरमार्गिकांचा वापर करता येणार आहे. या आंतरमार्गिकांवरून उतरून किंवा प्रवेश करून वेगवेगळय़ा भागांमध्ये जाणारी वाहतूक सुलभ होईल. प्रामुख्याने बॅरिस्टर रजनी पटेल चौकातून (लोटस जेट्टी) पुढे वरळी, वांद्रेच्या दिशेने तर वत्सलाबाई देसाई चौकातून (हाजी अली) पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे जाणारी वाहतूक सुलभ होईल. उत्तर दिशेला प्रवास करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी पुढील टप्प्यात बिंदुमाधव ठाकरे चौकापर्यंतचा किनारी रस्ता 10 जुलैपर्यंत सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्या दिशेने कामे सुरू आहेत. सुमारे 14 हजार कोटी खर्च करून हा प्रकल्प बांधण्यात आला आहे.