मालवीय यांच्या सेक्स स्कँडलचा भंडाफोड; आरएसएसच्या स्वयंसेवकाचा भाजप आयटी सेलप्रमुखावर खळबळजनक आरोप

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख आणि पश्चिम बंगाल भाजपचे सहप्रभारी अमित मालवीय यांच्यावर सेक्स स्कँडलचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम बंगालमधील स्वयंसेवक शांतनू सिन्हा यांनी केला आहे. मालवीय यांनी बंगालमधील फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. भाजपच्या कार्यालयातही त्यांनी महिलांवर अत्याचार केला, असा दावा शांतनू यांनी केला असून या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

शांतनू सिन्हा यांनी दोन दिवसांपूर्वी बंगाली भाषेत एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात मालवीय हे कोलकात्यातील फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये महिलांचे लैंगिक शोषण करतात, असा आरोप केला आहे. बंगालमधील भाजपचे नेतृत्व मालवीय यांना सुंदर महिला उपलब्ध करून देतात. तसेच महिला पुरवण्याच्या बदल्यात पक्षाचे पद पदरी पाडून घेतले जाते, असा दावाही त्यांनी केला आहे. केवळ फाइव्ह स्टार हॉटेलच नाही तर राज्यातील भाजप कार्यालयातही अशाप्रकारे महिलांचे लैंगिक शोषण केले जाते, असा आरोपही शांतनू यांनी केला आहे. शांतनू हे बंगालमधील भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस राहुल सिन्हा यांचे जवळचे नातेवाईक आहेत.

मानहानी केल्याबद्दल 10 कोटींची नोटीस

शांतनू यांच्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर या आरोपांचा इन्कार करत अमित मालवीय यांनी शांतनू सिन्हा यांना 10 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. मालवीय यांनी शांतनू यांनी बिनशर्त माफी मागावी आणि सोशल मीडियावर त्याच्याबद्दल लिहिलेल्या पोस्ट काढून टाकाव्यात अशी त्यांची मागणी आहे.

हातरस असो, लखीमपूर असो, आपल्या प्रतिष्ठत कुस्तीगीर खेळाडू असोत किंवा बिल्किस बानो असो, पंतप्रधानांनी सातत्याने गुन्हेगारांना राजकीय संरक्षण दिले आहे. पण, आता महिलांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे.  जोपर्यंत तुम्ही कारवाई करत नाही तोपर्यंत तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे सुप्रिया यांनी सुनावले.

 महिला आयोगामार्फत चौकशी करा

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेऊन 24 तासही उलटले नाहीत तोच आणखी एका भाजप नेत्याचे काळे कृत्य समोर आले. याने देशाची मान शरमेने खाली गेली असून मोदी कोणत्या तोंडाने महिला सुरक्षेच्या बाता मारतात, असा सवाल काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला. भाजपकडे थोडीजरी नैतिकता शिल्लक असेल तर मालवीय यांना तत्काळ पदावरून हटवण्यात यावे आणि याप्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्रालय तसेच राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी श्रीनेत यांनी केली.

मोदी के परिवार से बेटी बचाओ!

लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या भाजप व मित्रपक्षांच्या नेत्यांचे फोटो पोस्ट करत ‘मोदी के परिवार से बेटी बचाओ,’ असा हल्ला काँग्रेसने चढवला आहे. बृजभूषण सिंह, प्रज्वल रेवण्णा, कुलदीपसिंह सेंगर, संदीप सिंग, चिन्मयानंद, कन्हैयालाल मिश्रा, रामदुलार गौर, कुणाल पांडे आणि अमित मालवीय यांचे फोटो काँग्रेसने पोस्ट केले आहेत.

 भाजप आयटी सेल है या दरिंदों का जमावडा? काँग्रेसने चढवला हल्ला

उत्तर प्रदेशातील आयआयटी बीएचयूमध्ये गँगरेप झाला होता. त्यात सक्षम पटेल, कुणाल पांडे, आनंद चौहान यांची नावे आली होती. हे सगळे जण मोदींचे जवळचे होते. भाजपच्या आयटी सेलमध्ये महत्त्वाच्या पदांवर ते काम करत होते. त्यानंतर आता आयटी सेल प्रमुखाचेच काळे कारनामे समोर आले आहेत, असे नमूद करत ‘भाजप का आयटी सेल है या दरिंदों का जमावडा है’, असा सवाल सुप्रिया श्रीनेत यांनी केला.