>> दिलीप ठाकूर
काही अतिशय कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आपल्या चौफेर कारकीर्दीत असे विस्तृत व अफाट काम करतात की, त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोन, अथक परिश्रम आणि क्षमता यांचा आवर्जून आदर्श ठेवावासा वाटतो. रामोजी राव हे व्यक्तिमत्त्वही असेच होते. 8 जूनची सकाळ त्यांच्या निधनाच्या वृत्ताने झाली आणि माध्यम क्षेत्रात तसेच चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त झाली. माध्यम क्षेत्रात त्यांनी अतिशय भरीव योगदान दिले तसेच तेलुगू भाषेतील चित्रपटांबरोबरच कन्नड, तामीळ, बंगाली झालेच, पण हिंदी चित्रपट निर्मितीतही त्यांनी आपल्या उषाकिरण मुव्हीज या बॅनरखालील चित्रपट निर्मितीत कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. रामोजी राव चित्रनगरी परिसरातील गावांसाठी ते जणू देवच. तेथील अनेकांच्या मनात रामोजी राव यांना आदराचे स्थान आणि अनेकांच्या घरात फोटोदेखील.
16 नोव्हेंबर 1936 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिह्यातील पेडापरुपुडी गावात एका मध्यमवर्गीय कृषी कुटुंबात जन्मलेल्या रामोजी राव यांनी रामोजी चित्रनगरी ( फिल्म सिटी) या जगातील सर्वात मोठय़ा थीम पार्क आणि आदर्श अशा चित्रपट स्टुडिओची स्थापना केली. आपली पटकथा घेऊन या स्टुडिओत जायचे आणि अनेक प्रसंगांसाठीच्या चित्रीकरण स्थळांपासून ते तांत्रिक गोष्टींपर्यंत सगळे करून चित्रपट पूर्ण करून बाहेर पडायचे असा हा स्टुडिओ त्यांनी उभारला. विशेष उल्लेखनीय गोष्ट, संपूर्ण चित्रनगरीत सर्वच बाबतीत कमालीची शिस्त. कुठेही ‘चलता है’ हा प्रकार नाही. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धातील ही गोष्ट आणि त्याच वेळेस देशविदेशांतील चित्रपट रसिकांसाठी ही चित्रनगरी पर्यटनासाठीचे आकर्षणाचे स्थळ ठरले. मोठी स्वप्ने खरी करावीत ती ही अशी. या चित्रनगरीत लहानमोठय़ा कामासाठी तब्बल दहा हजार कर्मचारी आहेत.
रामोजी राव यांच्या बहुस्तरीय कार्यविस्ताराबाबत सांगावे तेवढे थोडेच. मार्गदर्शी चिट फंड, ईनाडू माध्यम समूह, ई टीव्ही नेटवर्क, रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूड्स, कालांजली, उषाकिरण मूव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स या रामोजी राव यांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. ई टीव्ही मराठीने महाराष्ट्रातील शहर आणि ग्रामीण भागातील अनेक युवकांना माध्यम क्षेत्रात महत्त्वाची संधी दिली. त्यामुळेच आजच्या त्यांच्या निधनाच्या वृत्ताने पत्रकार व वृत्तछायाचित्रकार हळहळले. एकूण बारा प्रादेशिक भाषेत ई टीव्हीचे जाळे होते.
चेरुकुरी रामोजी राव हे त्यांचे पूर्ण नाव. प्रचंड मेहनत घेत रामोजी राव यांनी आपले कार्यक्षेत्र विस्तारले. दक्षिण हिंदुस्थानातील हैदराबादमधील त्यांची चित्रनगरी 15 हजार एकरात उभारली आहे. हैदराबाद शहरातील नामपल्ली रेल्वे स्थानकापासून सुमारे एक ते दीड तासाच्या अंतरावर हे निसर्गरम्य ठिकाण आहे. आजपर्यंत येथे अनेक भाषांतील तीन हजारांहून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. गावखेडय़ापासून ते विदेशातल्या चकाचक लोकेशन्ससह विमान ते रेल्वे स्थानक अशी नानाविध लोकेशन्स येथे उपलब्ध आहेत. ‘शांतिनिकेतन’ या मध्यमवर्गीयांना परवडेल अशा हॉटेलसह ‘तारा‘, ‘सितारा’ ही आलिशान हॉटेल्स आहेत.
रामोजी राव यांनी चित्रपट निर्मितीत कायमच पारंपरिक सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांना प्राधान्य दिले. आपले चित्रपट सहकुटुंब पाहिले जातात याचे भान त्यांनी ठेवले. तेलुगू भाषेतील चित्रपट ही त्यांची खासीयत. कांचनगंगा, सुंदरी सुब्बाराव, श्रीवाटिकी, प्रेमलेखा, मल्लेमोग्गुलू, प्रेमायणम इत्यादी तेलुगू भाषेतील चित्रपट त्यांनी निर्माण केले. त्यांच्या ‘मयूरी’ या चित्रपटात नृत्यतारका सुधाचंद्रन हिला नायिका म्हणून संधी मिळाली. तिच्याच आयुष्यातील संघर्षावर आधारित हा चित्रपट आहे. हाच चित्रपट हिंदीत ‘नाचे मयुरी’ या नावाने रिमेक करण्यात आला. त्यातही सुधाचंद्रन नायिका असल्यानेच चित्रपट रसिक या चित्रपटाशी जोडले गेले. रामोजी राव निर्मिती ‘प्रतिघटना’ या चित्रपटाची राजश्री प्रॉडक्शन्स निर्मित ‘प्रतिघात’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. एन. चंद्रा या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आणि नाशिकमध्ये या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण झाले. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, अशोक सराफ, नाना पाटेकर, सुजाता मेहता इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. रितेश देशमुखला नायक म्हणून पहिली संधी रामोजी राव निर्मित ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून मिळाली. जेनेलिया डिसुझाचाही हा पहिलाच चित्रपट आणि याचे सगळे शूटिंग रामोजी राव स्टुडिओत झाले. ‘थोडा तुम बदलो, थोडा हम बदले’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली.
रामोजी राव यांना या चौफेर प्रवासात अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले. त्यात विशेष उल्लेखनीय असे, पद्मविभूषण, फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निर्माता), फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते. आपल्या 87 वर्षांच्या आयुष्यात रामोजी राव यांनी बहुस्तरीय कार्य करीत आपला कायमचा ठसा उमटवलाय.