NEET परीक्षा रद्द करा, SIT ची चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

नीट यूजी परीक्षेच्या निकालातील गोंधळावर पालक आणि विद्यार्थी संतप्त झाले असून आता देशभरात वाद निर्माण झाला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सोबत नीटचा निकाल रद्द करण्याची मागणी होत आहे. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी आणि 4 जून 2024 रोजी निकालाच्या आधारे होणारे समुपदेशन थांबवावे. नीट परीक्षेबाबत तेलंगणा येथील मोहम्मद फैज यांनी ही याचिका दाखल केली आहे.

यंदा नीट 2024 च्या परीक्षेमध्ये देशभरातून 23 लाख 33 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी म्हणजेच 4 जून रोजी नीट परीक्षेचा निकाल जाहीर केला. यावेळीच्या परीक्षेमध्ये 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळाले आणि विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी झज्जर येथील एकाच सेंटरचे आहेत. नीटचा निकाल 14 जून ला जाहीर होणार होता. मात्र दहा दिवस आधीच निकाल जाहीर झाला. त्यामुळे नीट परीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांनी नीटचा निकाल रद्द करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेत एसआयटी तपासाची आणि समुपदेशन थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. NEET परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, असे याचिकेत म्हटले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षेच्या निकालावरून नरेंद्र मोदी यांच्यावर शपथविधी सोहळ्यापूर्वीच घणाघाती टीका केली होती. मोदींनी अद्याप पंतप्रधानपदाची शपथही घेतली नाही आणि दुसरीकडे नीट परीक्षेतील हेराफेरीने 24 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब यांना उद्ध्वस्त करण्यात आलेय, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. शिवाय मी संसदेत तुमचा आवाज बनेन आणि तुमच्या भविष्याशी संबंधित मुद्दे जोरकसपणे मांडेन. तरुणांनी इंडियावर विश्वास व्यक्त केला आहे. इंडिया त्यांचा आवाज दबू देणार नाही, असे आश्वासनही राहुल गांधी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांना दिले आहे. याआधी शनिवारी, नीट-यूजी मधील वाढत्या गुणांच्या आरोपादरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सांगितले की, शिक्षण मंत्रालयाने 1 हजार 500 हून अधिक उमेदवारांच्या निकालांचे पुनरावलोकन करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे.