कुछ तो गडबड है! शपथ घेतल्यानंतर काही तासांतच केरळच्या खासदाराकडून केंद्रीय मंत्रिपदातून मुक्त करण्याची मागणी

रविवारी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपत घेतली. या NDA सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर काही तासांनंतर, केरळचे भाजप खासदार सुरेश गोपी यांनी पदमुक्त करण्याची मागणी केली आहे.

अभिनेते-राजकारणी सुरेश गोपी म्हणाले की, त्यांनी चित्रपट साइन केले आहेत आणि ते कोणत्याही किंमतीत त्यांना करायचं आहेत. तसेच या पदावरून मुक्त होऊन त्रिशूरच्या लोकांसाठी खासदार म्हणून काम करायचं आहे.

‘खासदार म्हणून काम करणं हे माझं उद्दिष्ट आहे. मी काहीही मागितलं नाही. मला या पदाची गरज नाही असं मी म्हटले होतं. मला वाटतं की, मला लवकरच या पदावरून मुक्त केलं जाईल. त्रिशूरच्या मतदारांना कोणतीही अडचण नाही. त्यांना हे माहित आहे आणि खासदार म्हणून मी त्यांच्यासाठी खरोखरच चांगलं काम करेन, मला माझे चित्रपट कोणत्याही किंमतीत करायचे आहेत’, असं सुरेश गोपी यांनी शपथविधी समारंभानंतर दिल्लीतील एका प्रादेशिक वाहिनीशी बोलताना सांगितलं.

सोमवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या नियोजित बैठकीपूर्वी गोपी यांचं वक्तव्य समोर आलं आहे.

गोपी, पक्षाचे ज्येष्ठ नेते जॉर्ज कुरियन यांच्यासह केरळमधील भाजपचे एकमेव उमेदवार होते ज्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं.

NDA सरकारमध्ये गोपींचा समावेश केल्यामुळे, भाजपला 2026 मध्ये निवडणूक होणाऱ्या केरळसाठी त्यांच्या योजनांबद्दलच्या भावना जनतेपर्यंत पोहोचवायच्या होत्या असं ते म्हणाले.

सुरेश गोपी यांनी डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला आणि केरळमधील भाजपचे पहिले खासदार म्हणून इतिहास रचला.

सुरेश गोपी यांनी तिरंगी लढतीत सीपीआयचे व्हीएस सुनील कुमार यांचा 74,000 मतांनी पराभव केला. काँग्रेसनं के मुरलीधरन यांना त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.