अतिउत्साह नडला; पंतप्रधान मोदींच्या शपथविधीवेळी इंदूरच्या भाजप कार्यालयात आग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा साजरा करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत असताना मध्य प्रदेशातील इंदूरमधील भाजपच्या चार मजली कार्यालयाच्या छताला रविवारी रात्री आग लागली. रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली.

भाजप मीडिया सेलच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काही फटाक्यांनी इमारतीच्या छतावरील प्लायवूड, जुना सोफा, टाकाऊ साहित्य आणि इतर विविध फर्निचरचे तुकडे पेटवून दिल्याने आग लागली.

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

‘भाजपचे कार्यकर्ते भाजप कार्यालयाखाली फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करत असताना, फटाक्यांनी कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर म्हणजे चौथ्या मजल्यावर आग लावली’, असं इंदूरचे एसीपी तुषार सिंह यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं.

‘गाद्या आणि पलंग यांसारखे काही साहित्य तिथे पडून असल्याने आग लागली. आग वेळेत आटोक्यात आणण्यात आली आणि फारसे नुकसान झाले नाही’, असं ते पुढे म्हणाले.