राज्यात येत्या 26 जून रोजी होणाऱया विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अतिरिक्त वेळ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार मतदारांना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. शिवसेनेचे उमेदवार अनिल परब यांनी वेळ वाढवावी अशी मागणी केली होती.
मुंबईसह कोकण आणि नाशिक येथील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 26 जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आयोगाने वेळापत्रक जाहीर केले असून सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ देण्यात आली होती, मात्र यावर आक्षेप घेत शिवसेना आमदार अनिल परब यांनी निवडणूक आयोगाचे दार ठोठावले होते.
शिवसेनेची ही मागणी मान्य करताना केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाचा कालावधी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत असा केला आहे. आयोगाच्या या निर्णयाबाबत अनिल परब म्हणाले की, या निवडणुकीत मतदानासाठी कोणतीही सार्वजनिक सुट्टी नाही. त्यामुळे मतदारांना त्यांचा लोकशाही हक्क बजावणे कठीण झाले आहे. त्यांना मतदानाच्या त्यांच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवले जाईल. त्यामुळे निवडणुकीत मतदान कमी होऊ शकते. त्यामुळे मतदानाची वेळ वाढवणे गरजेचे होते. आयोगाने आमची मागणी पूर्ण केली असून याचा फायदा निश्चितच मतदानाची टक्केवारी वाढीसाठी होईल, असा विश्वास यावेळी अनिल परब यांनी व्यक्त केला.