लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा देणाऱया भाजपचा वारू 239 जागांवर रोखून मतदारांनी त्यांना अक्षरशः जमिनीवर आणले. विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा, झारखंड आणि राजस्थानमध्ये एनडीएला जबर दणका बसला. लोकसभा निवडणुकीनंतर ताळ्यावर आलेल्या तीन राज्यांनी सरकारी पदांवर मोठी भरती जाहीर केली आहे. बिहार आणि हरयाणात तब्बल 96 हजार पदे भरण्यात येणार आहेत.
हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी 50 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली. हरयाणा कर्मचारी निवड आयोगाच्या नवीन अध्यक्षांच्या शपथविधी समारंभात ते बोलत होते. सरकारी नोकऱयांसाठी पारदर्शक भरती पद्धत सुरू ठेवण्यावर भर दिल्याचे त्यांनी सांगितले. तर बिहार सरकारने नुकतीच आरोग्य विभागातील 45 हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा केली. आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी याबाबतची माहिती दिली.
उत्तर प्रदेशात 2 लाख रिक्त पदे भरणार
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारमधील तब्बल 2 लाख रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा केली. रिक्त सरकारी पदांची माहिती भरती आयोगाकडे पाठवून ती भरण्याचे निर्देश योगींनी दिले. निवडणुकीपूर्वी पेपरफुटीमुळे पोलिसांच्या 60 हजार पदांसाठीची भरती रद्द करण्यात आली होती. यात 49 लाख उमेदवारांचा समावेश होता. राज्यात विविध विभागांमध्ये सुमारे 2 लाख पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्र्यांनी पेपरफुटी रोखण्यासाठी नवा कायदा आणण्याचीही घोषणा केली आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीत 2 हजारांनी वाढ केली. तसेच राज्यातील 41 हजार पदांवर सुरू असलेली भरती पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.