वरळी कोळीवाडय़ातील पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱया नालेसफाईची (क्लिव्ह लँड बंदर), विभागातील पावसाळ्यात पाणी साचण्याची ठिकाणे, जनता वसाहत, वरळी कोळीवाडा, गोल्फादेवी, सिद्धिविनायक नवरात्र उत्सव मंडळ येथील समुद्रकिनाऱयावरील पातमुखांची शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. या वेळी डेब्रिज, अपुरा पाणीपुरवठा तसेच इतर अनेक समस्यांबाबतही रहिवाशांशी संवाद साधला.
मान्सूनपूर्व कामांची पाहणी करण्याबरोबर आदित्य ठाकरे यांनी वरळी कोळीवाडय़ातील विविध समस्या समजून घेतल्या. आदित्य ठाकरे यांनी वरळी कोळीवाडय़ातील मुख्य रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनसुद्धा रखडलेली दुरुस्ती, नवनीत चौकाजवळ पाणी साचते तिथे पंपाची व्यवस्था करणे, समुद्रावरील कचरा, डेब्रिस ज्यामुळे ही पातमुखे बंद होऊन पावसाळी पाण्याचा निचरा थांबतो, ती पातमुखे स्वच्छ करण्यासंदर्भात, कचरा व डेब्रिज साफ करण्यासंदर्भात, अनियमित होणारा पाणीपुरवठा यासंदर्भात विभागातील रहिवाशांशी संवाद साधला तसेच कल्याण पेंद्र इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत चर्चा केली.
या वेळी विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर, शिवसेना शाखा क्रमांक 193चे शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी, शाखा संघटक संस्कृती सावंत, शाखा समन्वयक रुणाल लाड, युवासेना सहसचिव राजवी लाड, उपसचिव संदीप वरखडे, विभाग अधिकारी संकेत सावंत, शाखेचे सर्व उपशाखाप्रमुख, उपशाखा संघटक, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, महिला-पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.