नवनियुक्त खासदार, अभिनेत्री कंगना राणावतला गुरुवारी चंदिगढ विमानतळावर सीआयएसएफच्या महिला कर्मचाऱयाने कानशिलात लगावली. कुलविंदर कौर असे सीआयएसएफच्या महिला जवानाचे नाव आहे. कुलविंदरची आई शेतकरी आंदोलनात सहभागी झाली होती. तिच्या आईची खिल्ली कंगनाने उडवली होती. त्या रागातून कंगनाच्या कानशिलात लगावली, असे सांगणाऱया कुलविंदरचा व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र आता या प्रकरणानंतर कंगनाच्या एका जुन्या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. या स्क्रीनशॉटमध्ये कंगनाने 2022 च्या ऑस्कर सोहळय़ात अभिनेता विल स्मिथने कॉमेडियन ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावण्याच्या कृतीचे समर्थन केले होते. त्या वेळी कंगनाने म्हटले होते की, काही मूर्खांना हसवण्यासाङ्गी कोणी माझ्या आई किंवा बहिणीच्या आजाराची खिल्ली उडवली तर मीही त्याच्या कानाखाली मारली असती. कंगनाने स्मिथ-ख्रिसच्या फोटोवर कमेंट देताना टाळय़ा वाजवण्याचा इमोजीही शेअर केला होता.
एकीकडे आईवरून बोलल्यामुळे सीआयएसएफच्या कुलविंदर कौरने कंगनाला कानाखाली मारलेली असताना ‘दुसरीकडे आपल्या आईबद्दल कुणी बोलले असते तर मीही कानाखाली मारले असते,’ असा दावा करणारा स्क्रीनशॉट व्हायरल होतोय. कंगनाच्या जुन्या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट चांगलाच व्हायरल होत असून नेटिजन्स त्यावर कमेंट्स देत आहेत.