देवगडमध्ये नाले तुंबले; नगरपंचायतीचा स्वच्छतेचा दावा फोल

देवगड तालुक्यामध्ये शनिवारी मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे शहरात ठीक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे नगरपंचायतीने केलेला नाले आणि गटार स्वच्छतेचा दावा फोल ठरला. दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच नागिराकांना सुद्धा रस्त्याने चालताना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे नागरिकांकडून नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. देवगड तालुक्यात सुद्धा शनिवारी मुसळधार पाऊस पडला. मात्र नाले आणि गटार साफ न केल्यामुळे रस्त्यावर पाणी तुंबले आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. श्रीकृष्ण नगर येथे गटाराचे बांधकाम अर्धवट असल्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. तसेच शेठ म.ग हायस्कूल समोरील नालेसफाई न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर आले आणि त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे नगरपंयातीने केलेला नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. तसेच नाल्यांमधील घाण रस्त्याच्या बाजूला न टाकता त्याच ठिकाणी ठेवण्यात आली आहे. मुसळधार पावसात ती घाण पुन्हा नाल्यामध्ये जाऊन नाला तुंबण्याची शक्यता आहे. नगरपंचायतीच्या दिखाऊपणाच्या कारभारावर शहरातील नागरिक चांगलेच संतप्त झाले आहेत. दिखाऊपणाची नालेसफाई कय उपयोगाची? मुख्याधिकारी याकडे गांभिर्याने पाहणार आहेत का? असा संतप्त सवाल शहरातील नागरिक विचारत आहेत.

देवगड-जामसंडे मुख्य रस्त्यावर श्रीकृष्ण नगर येथे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात अपघात झाले होते. संबंधित प्रश्नावर सत्ताधारी व विरोधकांनी आवाज उठवला होता. मात्र ढिम्म प्रशासनाने कागदी घोडे नाचवण्या पलीकडे कोणतीही भूमिका घेतली नाही. कहर म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने भर पावसात गटार बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला हे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.