व्ही. के. पांडियन यांची सक्रिय राजकारणातून निवृत्ती, लोकसभा निवडणुकीत BJD च्या खराब कामगिरीनंतर निर्णय

 

 

दिल्लीत एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना ओडिशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे जवळचे समजले जाणारे नेते व्ही. के. पांडियन यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बिजू जनता दल पक्षाची कामगिरी सुमार राहिली. BJD ला एकही जागा जिंकता आली नाही. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत व्ही. के. पांडियन यांनी सक्रिय राजकारणाला रामराम ठोकला.

ओडिशामध्ये लोकसभेच्या 21 जागा आहेत. यापैकी 20 जागांवर भाजपने विजय मिळवला, तर 1 जागा काँग्रेसने जिंकली. BJD ला भोपळाही फोडता आला नाही. गेल्या (2019) लोकसभा निवडणुकीत BJD ने 12 जागा जिंकल्या होत्या. या पराभवाचे खापर व्ही. के. पांडियन यांच्यावर फोडले जात होते.

दरम्यान, सक्रिय राजकारणातून बाजूला होताना व्ही. के. पांडियन भावूक झाले. मी आता जाणीवपूर्वक सक्रिय राजकारणातून माघार घेण्याचे ठरवले आहे. या प्रवासात माझ्यामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मला माफ करा, असे पांडियन म्हणाले.