जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग महिन्याभरात तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्रशासित प्रदेश जम्मू-कश्मीरमध्ये शांततेत मतदान झाले. मतदारांचा उत्साहही वाखानण्याजोगा होता. त्यामुळे जम्मू-कश्मीरमध्ये ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत विधानसभा निवडणूक घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा आणि तत्कालिन राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात (जम्मू-कश्मीर आणि लडाख) विभाजन करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायम ठेवला होता. तसेच 30 सप्टेंबरपर्यंत जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेण्याचे आदेश सरकारला दिले होते. लोकसभा निवडणुकीची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू-कश्मीरमध्ये लवकरच निवडणूक लागेल असे म्हटले होते. त्यानुसार आता निवडणूक आयोगाने येथे तयारीही सुरू केली आहे.
दरम्यान, जम्मू-कश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी मतदारांचा उत्साह दिसून आला. जवळपा, 58.58 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे गेल्या तीन दशकात पहिल्यांदाच कश्मीर खोऱ्यात शांततेत मतदान पार पडले. आता येथे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असून निवडणूक आयोगाने मतदारांची यादी अपडेट करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनी विविध पक्षाच्या नेत्यांशीही शुक्रवारी चर्चा केली. विधानसभा निवडणुकीनंतर जम्मू-कश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे.