लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमत मिळविण्यापासून वंचित राहिला. भाजपला सर्वात मोठा फटका महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये बसला. दोन्हीकडे गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपला निम्म्या जागा मिळतानाही नाकीनऊ आले. त्यातल्या त्यात भाजपला सर्वात जास्त जिव्हारी लागणारा पराभव फैजाबादमध्ये झाला. फैजाबाद लोकसभा मतदारसंघातच अयोध्या येथे आणि तिथेच भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर टीकेचे बाण सोडले जात आहे. चित्रपट निर्माते आनंद पटवर्धन यांनीही भाजपवर निशाणा साधला.
रामनामाचे राजकारण करणाऱ्या भाजपला अयोध्यावासिकांनी जोरदार चपराक लगावली, अशा कठोर शब्दात आनंद पटवर्धन यांनी टीका केली. ‘राम के नाम’ या माहितीपटासाठी प्रसिद्ध असलेल्या आनंद पटवर्धन यांनी पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीजद्वारे आयोजित केलेल्या चर्चेदरम्यान भाजपवर हल्लाबोल केला. ‘अ व्होट फॉर हेट कॅन नेव्हर वीन’ हा चर्चेचा मुख्य विषय होता. या चर्चेमध्ये वकील, विविध संघटनांचे कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि प्रतिष्ठीत व्यक्ती सहभागी झाले होते.
उत्तर प्रदेशमधील खराब कामगिरी आणि अयोध्येतील भाजपच्या पराभवावर बोलताना आनंद पटवर्धन म्हणाले की, रामनामाचे राजकारण करणाऱ्या भाजपला अयोध्येतील जनतेने जोरदार चपराक दिली आहे. धर्मनिरपेक्ष मुल्यांशी लढणाऱ्या आमच्यासारख्या लोकांनी यूपीचे मतदार पलटतील याची कल्पनाही केली नव्हती. अयोध्येतील दलित नेत्याच्या विजयाचा आनंद साजरा केला पाहिजे. देशात फॅसिस्ट विरोधी शक्तींना साध्य करण्यासाठी खुप मोठा पल्ला आहे. ‘फ्री प्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
लल्लू सिंह पराभूत
अयोध्या हे फैजाबाद लोकसभा मतदारसंघात येतं. या मतदारसंघात भाजप उमेदवार लल्लू सिंह आणि समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांच्यात प्रमुख लढत झाली. या लढतीत भाजप उमेदवार लल्लू सिंह यांचा 54 हजार 567 मतांनी पराभव झाला. अयोध्येतील हा पराभव पचवणं भाजपला खूप जड जाणार आहे. कारण अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा हा भाजपने प्रतिष्ठेचा केला होता. आणि राम मंदिराच्या अवती-भोवती देशात आणि खास करून यूपीमध्ये भाजपचे संपूर्ण राजकारण फिरले. यामुळे अयोध्येत भाजपचा पराभव झाल्याने सर्वच चकीत झाले आहेत.
दलित उमेदवाराचा विजय ऐतिहासिक
अयोध्या म्हणजेच फैजाबाद लोकसभा मतदारसंघाचा यावेळचा निकाल हा ऐतिहासिक मानला जात आहे. याचे कारण म्हणजे 1957 नंतर पहिल्यांदाच अनुसूचित जमातीशी संबंधित असलेले अवधेश प्रसाद हे लोकसभेवर निवडून गेले आहेत. या निवडणुकी भाजपने राम मंदिराच्या नावाने मते मागितली होती. तरीही फैजाबादमधील जनतेने भाजपला नाकारले.