घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी फरार असलेल्या आणखी दोघांना क्राईम ब्रँच युनिट-7 ने अटक केली. जान्हवी मराठे आणि सागर कुंभार अशी त्या दोघांची नावे आहेत. ते दोघे गोवा येथील हॉटेलमध्ये लपून बसले होते. पोलिसांना जान्हवीकडे दोन आधारकार्ड मिळून आली आहेत. त्या दोघांच्या अटकेने अटक आरोपीची संख्या चार झाली आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी आतापर्यंत 17 जणांचा बळी गेला आहे. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचची एसआयटी करत आहे. दुर्घटनाप्रकरणी पोलिसांनी इगो मीडियाचे संचालक आणि पंत्राटदार यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. गुन्हा नोंद झाल्यावर इगो मीडियाचे संचालक जान्हवी मराठेने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने जान्हवीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अटक होईल या भीतीने जान्हवीने मुंबईतून पळ काढला होता. तसेच पंत्राटदार सागर कुंभारचादेखील पोलीस शोध घेत होते. तोदेखील पोलिसांना गुंगारा देत होता.
सागर आणि जान्हवी हे दोघे गोवा येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-7 चे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक महेश तावडे यांच्या पथकातील उपनिरीक्षक शेलार आणि पथक हे गोव्याला गेले. तेथे एका हॉटेलबाहेर पोलिसांनी फिल्डिंग लावून त्या दोघांना आज सायंकाळी ताब्यात घेतले. जान्हवीकडे पोलिसांना वेगवेगळय़ा नावाची दोन आधारकार्ड मिळाली आहेत. त्या आधारकार्डचा वापर करून जान्हवी हॉटेलमध्ये राहत होती. दुर्घटनाग्रस्त हार्ंडगच्या परवानगीपासून ते उभारणीपर्यंत जान्हवी ही इगो मीडियाची संचालक होती, तर सागर हा पंत्राटदार होता. त्याने ते दुर्घटनाग्रस्त हार्ंडग बनवले होते. त्या दोघांना गोवा येथून ताब्यात घेऊन रात्री उशिरा मुंबईत आणण्यात आले. रविवारी त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे.