अनेक वेळा सरकार केवळ एकच दिवस टिकते. त्यामुळे येणारे ‘एनडीए’चे सरकारही फारकाळ टिकणार नाही, असा हल्लाबोल आज तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. आम्ही आज सरकार स्थापन करण्याचा दावा करीत नाही, याचा अर्थ असा नाही की कधीच करणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
ममता बॅनर्जी यांनी ‘एनडीए’च्या अस्थिरतेवर बोट ठेवत सरकार लवकरच कोसळेल असे संकेत तृणमूल काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिले. हे सांगताना देशात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार कधीही पेंद्रातील सत्ता ताब्यात घेऊ शकते, असेही त्या म्हणाल्या. ‘चारशे पार’चा नारा देणाऱया भाजपला स्वबळावर बहुमतही मिळवता आले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘इंडिया’ आघाडीने अद्याप सरकार स्थापनेचा दावा केला नसला तरी परिस्थिती बदलत असते. म्हणून आम्ही वाट पाहत आहोत, असेही त्या म्हणाल्या.
मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार नाही
नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याला आपण उपस्थित राहणार नसल्याचे ममता यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, भाजप बिगर लोकशाही आणि बेकायदेशीर पद्धतीने सरकार स्थापन करत आहे. देशाला बदल हवा आहे. जनादेश बदलासाठी होता. हे नरेंद्र मोदींच्या विरोधात होते, त्यामुळे त्यांनी पुन्हा पंतप्रधान होऊ नये. दुसऱया कोणाला तरी पंतप्रधान होऊ द्यायला हवे होते, असेही त्या म्हणाल्या.