लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हेच सरकारच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतात. ‘एनडीए’ला राहुल गांधीच नडू शकतात, अशी एकमुखी भावना काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत व्यक्त होत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनीच संसदेचे विरोधी पक्षनेते पद स्वीकारावे, अशी मागणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून होत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 99 जागांवर विजय मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक दिल्लीत पार पडली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे, असा आग्रह धरला आहे. शिवाय राहुल गांधी यांना पक्ष सदस्यांच्या भावना मान्य कराव्या लागतील, असेही म्हटले आहे. शिवाय कार्यकारिणीच्या बैठकीतही संसदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधींच्याच नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल राव यांनीही सांगितले.
मोदींनी नेतृत्व करण्याचा नैतिक अधिकार गमावला – सोनिया गांधी
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी केवळ स्वतःच्या नावावर जनतेचा कौल मागितला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल म्हणजे मोदींचा राजकीय आणि नैतिक पराभव आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी ते पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यास इच्छुक आहेत, मात्र त्यांनी नेतृत्व करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असे टीकास्त्र सोनिया गांधी यांनी सोडले.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनियांची निवड
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज सायंकाळी झालेल्या बैठकीत लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या बैठकीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी यांची संसदीय पक्षाच्या प्रमुखपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. याला सर्व खासदारांनी एकमताने मंजुरी दिली.
शपथविधीपेक्षा भारत-पाकिस्तान मॅच बघेन – शशी थरूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळय़ावर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी जोरदार टीका केली. मोदींच्या शपथविधी सोहळय़ासाठी अद्याप मला निमंत्रण आले नाही. त्यामुळे शपथविधी सोहळा बघण्यापेक्षा मी भारत-पाकिस्तानचा क्रिकेट सामना बघणे पसंत करेन, असे शशी थरूर म्हणाले.