पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील विशाल अगरवाल याच्या महाबळेश्वरातील तारांकित हॉटेल एमपीजी हॉटेलमधील विनापरवाना बांधकाम जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करत उद्ध्वस्त केले. आज सकाळी सात वाजता तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पालिकेच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरविला.
पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघातातील प्रमुख आरोपीचे वडील विशाल अगरवाल याचे महाबळेश्वर कनेक्शन समोर आले होते. विशाल अगरवाल यांनी पारशी जिमखाना ट्रस्टला रहिवासाकरिता दिलेली मिळकत विकत घेऊन तेथे आलिशान हॉटेल सुरू केले. त्याचप्रमाणे पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना हाताशी धरून विनापरवाना आलिशान आठ कॉटेज बांधले. शासनाने दिलेल्या मिळकतीचा अगरवाल याने वाणिज्य कारणासाठी वापर सुरू केला. मात्र, येथे विनापरवाना बांधकाम केल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
दरम्यान, अपघातानंतर अगरवाल याचे वादग्रस्त हॉटेल चर्चेत आले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हॉटेलवर कारवाई सुरू केली. प्रथम हॉटेलमधील बेकायदा बारला सील ठोकण्यात आले. त्यानंतर 31 मे रोजी सील ठोकून हॉटेल बंद केले. त्याचदिवशी नोटीस बजावत हॉटेलमधील विनापरवाना आठ कॉटेजचे बांधकाम 24 तासांत काढण्याचा अल्टिमेटम दिला होता.
याबाबत हॉटेल प्रशासनाने काहीच केले नसल्याने सकाळी कारवाई करण्यासाठी पथक हॉटेलवर पोहोचले. तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पालिकेच्या पथकाने पंचांसमक्ष कारवाई करत बेकायदा कॉटेजवर बुलडोझर चालवून ते जमीनदोस्त केले. त्यानंतर पुन्हा हॉटेलला सील ठोकण्यात आले आहे. दरम्यान, अगरवाल याच्या एमपीजी क्लब हॉटेलवर आजअखेर तीन कारवाया झाल्या आहेत. चौथ्या कारवाईचे प्रशासनाकडून संकेत मिळत असून, ही मिळकत लवकरच शासनजमा केली जाईल, अशी माहिती मिळत आहे.