>> अभिराम भडकमकर
ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय माधवराव खाडिलकर यांचं ‘खरं सांगायचं तर’ हे स्मरणरंजनात्मक आत्मचरित्र. जायगव्हाण या सांगलीतील गावापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास, एनएसडीमधील ‘स्व’ शोधाचा त्यांचा काळ आणि पुढे अर्थवाही रंगभूमीवरील त्यांचे योगदान हे सगळंच अधोरेखित करणारे आहे.
सांगली टू दिल्ली टू जर्मनी टू मुंबई असा मनोहारी प्रवास करत अभिनेता म्हणून स्वतची एक नाममुद्रा कोरलेले ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय श्री. माधवराव खाडिलकर यांचं ‘खरं सांगायचं तर’ हे स्मरणरंजनात्मक आत्मचरित्र नुकतंच वाचनात आलं. ते परममित्र प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे.
माझा सांगलीशी अत्यंत जवळचा संबंध. त्यातच मी माधवरावांप्रमाणेच दिल्लीच्या राष्ट्रीय नाटय़ विद्यालय म्हणजे एनएसडीचा माजी विद्यार्थी आणि मराठी रंगभूमी! त्यामुळे त्यांच्याशी मला एक वेगळीच जवळीक वाटणं स्वाभाविक. त्यामुळे अधाशासारखं हे आत्मचरित्र मी वाचायला घेतलं आणि त्यातील ओघवती भाषा व सहज गप्पा मारल्यासारखं निवेदन यामुळे ते मी अक्षरश एका बैठकीत पूर्ण केलं. मुळात आपल्याकडे अभिनेते, रंगकर्मी स्वतच्या प्रवासाबद्दल आणि स्वतच्या काम करण्याच्या प्रािढयेबद्दल फारसं काही लिहीत नाही. कधी कधी चांगले मुलाखतकार त्यांच्याकडून हे सगळं काढून घेतात, पण ते फारच अपवादात्मक. त्यामुळे अर्थवाही रंगभूमीवर फारशा न रमलेल्या तरीही निष्ठेने स्वतला हवं त्या पद्धतीचं नाटक करत राहणाऱया या रंगकर्मीने स्वतच्या वैयक्तिक आणि रंगभूमीविषयक जीवन प्रवाहाला शब्दबद्ध करणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. अलीकडेच कुमार सोहनी यांनीही अशा पद्धतीचं लेखन करायला सुरुवात केली आहे ही आनंदाची बाब.
हे स्मरणरंजन जागवलं जातं जायगव्हाण या सांगलीतील त्यांच्या गावापासून. त्या काळचं ग्रामीण भागाचे चित्र, निसर्गाशी असलेली मैत्री आणि निर्व्याज, निरागस असते आयुष्य. अर्थात त्यामध्ये नाटय़मय प्रसंगही भरपूर आहेत. उदाहरणार्थ, वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना वडिलांनी अस्वलाशी खेळायला लावलेली कुस्ती, ज्यामुळे आपण आयुष्यात कुठल्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो हा त्यांच्या मनावर ठसलेला आत्मविश्वास. सुखवस्तू, अगदी श्रीमंतच म्हणावं अशा पद्धतीची त्यांची राहणी आणि अचानक गांधी हत्येनंतर सगळंच उद्ध्वस्त होणं. दोन दोन वाडे असलेले, इनामदारी राहणी असलेलं त्यांचं कुटुंब गणपतीच्या देवळामध्ये तीन दगडांच्या चुली मांडण्यापासून पुन्हा आयुष्याला सुरुवात करतात. त्यानंतर आलेली आर्थिक विपन्नावस्था, त्याला सामोरं जाणं, शिक्षणासाठीही कसंबसं वडिलांनी पैसे उभे करणं आणि त्यातून त्यांनी आपली शैक्षणिक पात्रता सिद्ध करणं यामध्येच पोवाडे गाणं, अभिनय करणं, मिळेल तिथे नाटकात काम करणं. या सगळ्यातून त्यांच्यामध्ये एक कलाकार आकाराला येत होता.
मात्र जवळच्या एका नातेवाईकांनी कुंडली मांडून “तू बँक मॅनेजर होशील” असं भविष्य सांगितलं होतं. माधवरावांनी अर्थातच ते हसण्यावारी नेलं, पण पुढील आयुष्यामध्ये ते प्रत्यक्षात आलं. याच काळामध्ये राष्ट्रीय नाटय़ विद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची इच्छा होणं, अनुभवी व्यक्तीने त्यांना सहकार्य न करणं आणि घरची आर्थिक परिस्थिती नसताना या अत्यंत वेगळ्या आणि आत्मघातकी वाटेवर पाऊल टाकण्याचा त्यांचा इरादा कायम राहणं.
वडील आजारी असताना त्यांचा आशीर्वाद घेऊन माधवराव दिल्लीला जातात आणि एनएसडीचा इंटरव्हय़ू देतात. ती फारच बहारदार कथा आहे. या मुलाखतीत त्यांचा आवाज, त्यांचं संस्कृत भाषेवरचं आणि उच्चारावरचं प्रभुत्व, त्यांचा अभिनय, गायनाची असलेली जाण हे सगळं पाहून जवळ जवळ निवड निश्चित झालेली असतानाच अल्काझी विचारतात, “जर शिष्यवृत्ती मिळाली नाही तर?” माधवराव ठामपणे सांगतात, “तर मला हे प्रशिक्षण घेता येणार नाही” आणि ते बाहेर पडतात. आयुष्यात सुखाबरोबरच दुःखही पाठलाग करत कसं येतं त्याचा अनुभव माधवरावांना मिळतो. दिल्लीची शिष्यवृत्तीसह निवड झाल्याची बातमी आणि वडील गेल्याची बातमी या एकत्रितच हातात पडतात आणि नियतीच्या या खेळापुढे “मी जिंकलो, मी हरलो” म्हणत हतबल ठरतात.
एनएसडीमधल्या प्रशिक्षणाबद्दल त्यांनी अत्यंत सविस्तर लिहिलं आहे. काय शिकवलं जातं, कसं शिकवलं जातं, प्रत्येकाची कार्यशैली, शिकवण्याची पद्धत आणि कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावरही ते लिहितात. अल्काझींची कडक शिस्त ही कधी कधी एकाधिकारशाहीकडे जाते हेही ते नमूद करतात. शिष्यवृत्ती असली तरी आमच्या वेळेप्रमाणे ते वास्तव्य सुखावह नव्हतं. कारण आम्हाला वसतिगृह, मेस हे सर्व उपलब्ध होतं. मात्र त्या वेळी विद्यार्थ्यांना दिल्लीत राहण्याची स्वत सोय करणं आणि जेवणाचीही सोय करणं आवश्यक होतं. मग ओळखीपाळखीतून स्वस्तातली जागा बघ, तिथली स्वयंपाकाची जबाबदारी घे, अशा पद्धतीचे मार्ग चोखाळत त्यांचं शिक्षण सुरू होतं. तिथेच त्यांना भेटतात फ्रिट्स बेनेविट्ज नावाचे एक श्रेष्ठ शिक्षक. फ्रिट्झ माझेसुद्धा शिक्षक होते. मलाही शिक्षक म्हणून लाभले. माझ्याही आयुष्यावर आणि कलाविषयक जाणिवांवर त्यांचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे माधवरावांना त्यांच्याबद्दल किती आत्मीयता वाटते हे मी समजू शकत होतो. या बेनेविट्जनी त्यांना विद्यार्थी म्हणून शिकवलंच, पण खास त्यांना प्रशिक्षणानंतर जर्मनीलाही नेलं. वर्षभराची शिष्यवृत्ती देऊन तिकडचं नाटक, तिकडचे नाटकवाले, तिकडचं वातावरण या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी. फ्रिट्झ सर आणि माधवराव या गुरु-शिष्यातील जिव्हाळा त्यांनी सुरेख पद्धतीने चितारला आहे. त्यानंतर मुंबईला येणं, मुंबईमध्ये व्यावसायिक म्हणजे अर्थवाही रंगभूमीवर काम करण्याला सुरुवात करणं, साहित्य संघामध्ये नाटय़ प्रशिक्षण वर्ग घेणं, आर्थिक ओढाताण आणि कलात्मक आयुष्यामध्ये कुठलीही तडजोड न करण्याचा प्रयत्न करत काम करण्याची तारेवरची कसरत… या सगळ्याचं अतिशय छान वर्णन त्यामध्ये आहे.
एक दिवस ज्योतिष्याने सांगितल्याप्रमाणे बँकेमध्ये फार मोठी संधी मिळणं आणि आंतर बँक स्पर्धेमध्येसुद्धा त्यांनी त्यांच्या नाटकांद्वारे ठसा उमटवणं. माधवराव हे सगळं मांडत असताना त्यांनीच एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे ‘एकदा काय झालं’ या शैलीचा त्यांनी वापर केला आहे. म्हणजे आपण एखादी गोष्ट सांगत सुटतो आणि ती गोष्ट सांगताना समोरच्या माणसाला त्यामध्ये सामील करून घेतो अशा पद्धतीचं हे अत्यंत रसाळ असं एक आत्मचरित्र आहे. यामध्ये आयुष्यातले चढ-उतार आहेत, परंतु उतारावरील वेदना व्यथा आणि दुःख यामध्ये ते अडकून पडत नाहीत. त्यांचा उल्लेख करतात. त्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं याचा ओझरता आढावा घेतात आणि पुढे जातात. आपल्या आयुष्यातील आनंदाची, समाधानाची आणि यशाची शिखरं मात्र ते अधोरेखित करत जातात. यातून या माणसाचा स्वभाव लक्षात येतो. आयुष्यातील आनंद घ्यायचा आणि दुःख मागे टाकून पुढे निघून जायचं.
‘स्वामी’ नाटकातील माधवराव पेशव्यांची भूमिका मोहन वाघ यांच्या वाटय़ाला येणार असते, पण ती भूमिका एका ज्येष्ठ अभिनेत्याकडे जाते. त्या वेळेला निराश न होता ते म्हणतात, कदाचित अशीच आणखी एक मोठी भूमिका माझ्या वाट्याला येणार असेल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये भूमिका येते ‘सागरा प्राण तळमळला’ या मधुसूदन कालेलकरांच्या नाटकातील साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका. नाटक प्रचंड गाजतं. त्यानंतर ते ‘अनादी मी अनंत मी’ हे सावरकरांवरील नाटक लिहून काढतात. सादर करतात आणि त्याला प्रस्तावना मिळते ती साक्षात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची!
हा प्रयोग पाहिल्यानंतर अत्यंत प्रभावित झालेल्या बाळासाहेबांना ते सहजपणे विचारतात, “पुस्तक होत आहे नाटकाचं. द्याल का प्रस्तावना?” आणि बाळासाहेब म्हणतात, “हे तर आनंदाचं काम!” एक अतिशय सुरेख प्रस्तावना या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळते. काय होतं त्या प्रस्तावनेमध्ये… पाहूया पुढील भागात.
– [email protected]
(लेखक नाट्यकर्मी असून नाट्यक्षेत्राचे अभ्यासक आहेत)