लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठे यश मिळाले. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे 8 खासदार निवडून आले. लोकसभा निवडणुकीआधी अजित पवार यांच्यासह आमदारांनी बंड करत सत्तेची कास धरली होती. पक्ष आणि चिन्हही त्यांना मिळाले होते. त्यामुळे शरद पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती.
पक्ष, चिन्ह जाऊनही कार्यकर्ता फुटला नाही हे पवारांनी दाखवून देत 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवला. दुसरीकडे अजित पवार गटाला अवघी एक जागा मिळाली. या निकालानंतर कोल्हापुरात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी खास कोल्हापुरी तडका देणारे पोस्टर लावले आहे. यामुळे अजितदादा गटाला चांगल्याच मिरच्या झोंबल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.
कोल्हापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाभोळकर चौकामध्ये बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवरील मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. “सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं”, असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आल् असून या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्हही आहे. रात्रीच्या सुमारास हे बॅनर लावण्यात आले असून राज्यात सध्या याचीच चर्चा सुरू आहे.