ज्ञानराधा मल्टिस्टेटमधील लाखो लोकांच्या ठेवी अडकवून ठेवलेल्या सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांना शुक्रवारी पहाटे चार वाजता बीड पोलिसांनी पुण्याच्या राहत्या फ्लॅटमधून ताब्यात घेतले. दुपारी त्यांना बीडमध्ये आणण्यात आले. पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये त्यांची चौकशी सुरू होती.
बीडसह मराठवाड्यातील प्रत्येक शहरात असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या शाखेत लाखो ठेवीदारांच्या रकमा अडकल्या आहेत. आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही ठेवीदारांचे पैसे परत मिळत नाहीत. गत आठवड्यामध्ये तब्बल अकरा ठेवीदारांनी आपली फसवणूक झाल्याचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी बीड पोलीस अधीक्षकांनी एक पथक तपासासाठी रवाना केले होते. या पथकाने पहाटे चार वाजता पुणे येथील त्यांच्या फ्लॅटमधून सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांना ताब्यात घेतले.
दुपारी दोन वाजेपर्यंत सुरेश कुटे यांना आरबीआयचे कागदपत्र आणि सत्यता दाखल करण्यासाठी वेळ दिला होता. तीन वाजता त्यांना पुण्याहून बीडला आणण्यात आले. गुन्हे अन्वेषण आणि आर्थिक गुन्हे शाखा पथक त्यांची चौकशी करत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरेश कुटे हे ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी तारखावर तारखा देत होते.
विदेशी गुंतवणूकदारांनी ज्ञानराधा आणि इतर उद्योग समूहाला अडीच हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. या कर्जातून आपण ग्राहकांचे पैसे परत करत आहोत असे म्हटले जात होते. मात्र, प्रत्येक तारीख निघून जात होती आणि सुरेश कुटे हे पुन्हा फेसबुकच्या माध्यमातून दुसरी तारीख देत होते. त्यांच्या अटकेनंतर ठेवीदारांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर गर्दी केली होती.
ज्ञानराधा मल्टिस्टेटवर पोलिसांचा पहारा
सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांना पहाटे चार वाजता पुण्यामध्ये ताब्यात घेतल्यानंतर दुपारी बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या शाखांना बंदोबस्त तैनात करण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या शाखेच्या परिसरात पेट्रोलिंग अधिकारी नेमण्याचे आदेश देण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले.