सिनेविश्व: ‘फोकस’मधील तीन चेहरे

Urmila jagtap sharvari wagh ankita lande

>> दिलीप ठाकूर ([email protected])

आज मराठी चित्रपट, मालिका व वेबसिरीजमध्ये नवीन चेहरे इतके येताहेत की ते स्वतची ओळख निर्माण करण्यात कधी नि कसे यशस्वी ठरणार? पण हा प्रश्न ‘फोकस’मध्ये राहून काही अंशी तरी दूर होईलच!

शर्वरी वाघ, उर्मिला जगताप, अंकिता लांडे

आजच्या 20-20 क्रिकेट, ब्रेकिंग न्यूज, फास्ट फूड, फास्ट ट्रक, व्हॉटस अॅपच्या युगात मनोरंजन क्षेत्रात फोकसमध्ये येण्याची/राहण्याची संधी फार महत्त्वाची झाली आहे. बरं, कोणत्या क्षणी कोणतं गॉसिप घडेल, लग्न करतोय अशी गोड पोस्ट येईल, आम्ही वेगळे होतोय असे बिनदिक्कत सांगितले जाईल, ट्रोलिंगवरून कोणता कलाकार रागावेल आणि नवीन चर्चा सुरू होईल हे सांगता येत नाही. म्हणूनच तर ‘चर्चेतील चेहरे’ पटकन महत्त्वाचे ठरतात.

अजय सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ या भयपटाचा टिझर, ट्रेलर सोशल मीडियात भरभरून लाइक्स मिळवत असतानाच शर्वरी वाघच्या ‘तरस’ नृत्याचा ग्लॅमरस तडका आला आणि आता ती कुठेही गेली तरी पापाराझी तिच्या जणू मागावर असतात. गाडीतून उतरूदेखील न देता तिच्यावर फ्लॅश उडतात, त्याची रिल्स होतात. आज गुगलवर मोठय़ा प्रमाणावर शर्वरी वाघ सर्च होत आहे. आजच्या युगातल्या यशाची परिमाणं सोशल मिडियावर ठरत आहेत. अतिशय आत्मविश्वासाने ती पडद्यावर व प्रत्यक्षात वावरताना दिसते हे महत्त्वाचं. एकेक चित्रपट करत ती ‘मुंज्या’पर्यंत आली आहे. तिचं भन्नाट नृत्य गाजत आहे तसंच व्हिय़ूज मिळवत आहे. एक हिट गाणं स्टार घडवतं याचं हे आणखीन एक उदाहरण.

आजचं युग हे ओटीटीचं आहे. जगभरातील अनेक भाषांतील वेबसिरीज, चित्रपट पाहायला मिळण्याचं ठिकाण आहे. मग आता याच ओटीटीसाठी चित्रपट निर्माण होणं स्वाभाविक आहे. उर्मिला जगतापची भूमिका असलेला ‘सिंपलसी लव्ह स्टोरी’ हा हिंदी चित्रपट ओटीटीवर आला. तिने त्याची लिंक काही जणांना पाठवली (अशी व्यावसायिकता हवीच. आजच्या मार्केटिंग व प्रमोशनच्या युगात हा गुण खूपच महत्त्वाचा ठरतो) हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. मराठी चित्रपट व मालिका, मल्याळम चित्रपटात काम करत करत ती आता हिंदीत पोहोचली आहे. ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेतील तिची महाराणी सोयराबाई ही भूमिका लक्षवेधक ठरली. सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’मध्ये तिची भूमिका आहे. ‘या क्षेत्रात इतर कोणासारखं होण्यापेक्षा स्वतला काय करता येईल हे महत्त्वाचं’ हे तिचं सूत्र सकारात्मक आहे आणि त्यात तिचं वेगळेपण अधोरेखित होत आहे. तेच तिला स्वतला घडवण्यात उपयुक्त ठरेल.

मराठी चित्रपट, मालिका व वेबसिरीजमधून पुढे आलेला आणखी एक चेहरा… अंकिता लांडे! ‘गर्ल्स’ या चित्रपटातील कामगिरीने तिला महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट नवतारका हा पुरस्कार प्राप्त झाला. नेमक्या सोहळ्याच्या दिवशी ती उत्तराखंडला एका कार्यक्रमाला होती. अन्यथा नामांकन प्राप्त झालेल्या तीन नावांत आपलं नाव जाहीर झालंय याचं थ्रील तिने अनुभवलं असतं. ती मूळची पुणे जिल्हय़ातील जेजुरीजवळच्या तक्रारवाडी या गावची. तिथून पुणे आणि मग मुंबई असा तिच्या करिअरचा प्रवास. ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटानंतर तिचा शैलेश एल.एस. शेट्टी दिग्दर्शित ‘होय महाराजा’ हा क्राइम कॉमेडी प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिला प्रथमेश परब, अभिजीत चव्हाण यांच्यासह संधी मिळाली. तिचा क्रीन प्रेझेन्स अतिशय उत्तम आहे. तोच तिला फोकसमध्ये ठेवेल. ‘इलू इलू’ हा तिची भूमिका असलेला आणखी एक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. आज वर्षभरात सव्वाशे ते दीडशे हिंदी-मराठी चित्रपट तसंच वेबसिरीज निर्माण होत आहेत. त्यात अंकिताला कसा नि किती स्कोप मिळतो हेच पहायचं आहे. या तिघींनाही शुभेच्छा आहेतच. मनोरंजन क्षेत्रात सध्या स्पर्धा तगडी आहे, कोणतं नाणं कसं नि कधी चलनी होईल हे सांगता येत नाही. म्हणून कौतुकाची थाप महत्त्वाची.(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)