>> प्रसाद ताम्हनकर ([email protected])
पहिल्या आठवडय़ात श्रीहरिकोटा येथे असलेल्या एकमेव खासगी लाँचपॅडवरून एक रॉकेट अवकाशात सोडण्यात आले. अग्निकुल कॉसमॉस या खासगी कंपनीने तयार केलेले हे रॉकेट याच कंपनीच्या खासगी लाँच पॅडवरून अवकाशात झेपावले. या रॉकेटचे वैशिष्टय़ म्हणजे हे रॉकेट पूर्णपणे 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाने बनवले असल्याचा कंपनीने दावा केलेला आहे. अशा प्रकारे तयार करण्यात आलेले हे जगातले पहिले रॉकेट असल्याचा दावादेखील कंपनीने केला. IIT मद्रासमध्ये 2018 साली अग्निकुल कॉसमॉस या स्टार्टअपची सुरुवात झाली. आज या कंपनीने हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था ISRO च्या मदतीने हे रॉकेट पूर्णत्वास नेले. याचे नाव ‘अग्निबाण’ ठेवण्यात आले आहे.
हे रॉकेट बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानामध्ये आधी या रॉकेटचे डिझाइन संगणकावर तयार करण्यात आले आणि त्यानंतर 3D स्कॅनरच्या मदतीने त्याला तयार करण्यात आले. विशेष म्हणजे याच्या इंजिनाच्या कोणत्याही सुटय़ा भागाला जोडण्यासाठी वेल्डिंगचा वापर करण्याची आवश्यकता पडत नाही. 3D तंत्रज्ञानाने तयार केलेल्या अशा इंजिनाला सिंगल कॉम्पोनंट 3D इंजिन असे म्हणतात. रॉकेट तयार करणाऱया तंत्रज्ञाच्या मतानुसार हे रॉकेट 30 ते 300 किलो वजनाचा उपग्रह 700 किमी उंचीपर्यंत वाहून नेण्यास सक्षम आहे. मात्र या वेळी या रॉकेटचे कोणत्याही उपग्रहाशिवाय प्रक्षेपण करण्यात आले. पृथ्वीच्या उपकक्षेत त्याला प्रक्षेपित करण्यात आले असून येत्या काही महिन्यांत त्याच्या क्षमतेची चाचणी घेण्यात येईल.
हिंदुस्थानच्या जोडीने युरोप, अमेरिका, चीन, रशिया असे विविध देश अवकाश संशोधन क्षेत्रात 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. मात्र या देशांनी रॉकेट इंजिनाचे विविध भाग बनवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हे विविध भाग एकमेकांना जोडण्यासाठी वेल्डिंगची आवश्यकता असते आणि त्यांच्या मजबुतीसाठी अत्यंत भरीव असे वेल्डिंग करावे लागते, ज्यामुळे इंजिनाचे वजन वाढते. मात्र अग्निकुल कॉसमॉसने या अडचणीचा विचार करून वेल्डिंगची आवश्यकता न भासणारे सिंगल कॉम्पोनंट 3D इंजिन तयार केले आहे.
रॉकेटमध्ये इंजिन वापरण्यापूर्वी त्याचे कठोर परीक्षण केले जाते. त्याची सुरक्षितता तपासण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जातात. या चाचण्या घेण्यासाठी प्रयोगशाळेच्या वातावरणातून बाहेर काढून पृथ्वीच्या वातावरणात त्याची चाचणी घेतली जाते. दव, तापमान अशा विविध गोष्टी, त्यांचे होणारे परिणाम अभ्यासले जातात. इंजिनाने सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर ते रॉकेटमध्ये बसवण्यासाठी सज्ज होते. रॉकेटचे प्रक्षेपण करण्यापूर्वी इंधनवाहक, दिशादर्शक प्रणाली आणि इतर घटक जोडले जातात. द्रव ऑक्सिजन आणि केरोसीनवर चालणारे हे देशातील एकमेव
रॉकेट आहे.
3D तंत्रज्ञानाचा वापर केल्याने इंजिन तयार करताना लागणारा खर्च आणि वेळ अनेक पटींनी कमी होतो. मुख्य म्हणजे 3D तंत्रज्ञानाद्वारे बनवण्यात आलेल्या रॉकेटची किंमत पारंपरिक रॉकेटच्या उत्पादन खर्चापेक्षा दहापट कमी येते. अग्निकुलने आपले रॉकेट बनवण्यासाठी जर्मनीवरून खास प्रकारचा 3D प्रिंटर खरेदी केला आहे. प्रिंटर जेवढा मोठा तेवढय़ा मोठय़ा आकाराचे इंजिन त्याच्या मदतीने बनवता येते. सध्या अग्निकुलकडे असलेला 3D प्रिंटर हा हिंदुस्थानातील सर्वात मोठा 3D प्रिंटर आहे. रिसर्च पार्क इथे असलेल्या अग्निकुल फॅक्टरीमध्ये या प्रिंटरच्या मदतीने रॉकेटची निर्मिती करण्यात आलेली आहे.
व्यावसायिक वापरासाठी तसेच व्यावसायिक ग्राहकांसाठीदेखील रॉकेट निर्मिती करण्याची अग्निकुल योजना आखते आहे. अग्निकुलच्या सांगण्यानुसार नुकतेच ज्या सिंगल स्टेज रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले, त्यात एकच इंजिन होते. मात्र अशा रॉकेटसाठी प्रत्येक वेळी एकाच प्रकारच्या इंजिनाची गरज असते असे नाही. ग्राहकाच्या गरजेनुसार त्याचा आकार आणि संख्या कमी जास्तदेखील करणे सहज शक्य आहे. टेलिकम्युनिकेशन्स लिंक करण्यासाठी, अंतराळातून विविध ठिकाणच्या प्रतिमा प्राप्त करण्यासाठी, त्या-त्या आवश्यकतेनुसार रॉकेट पुरवण्याचे ध्येय अग्निकुलने ठेवले आहे. देशाच्या अवकाश उद्योगात खासगी कंपन्यांचा सहभाग आणि त्या वापरत असलेले आधुनिक तंत्रज्ञान हे चित्र येत्या काळात नक्कीच अधिक सुखावह असणार आहे हे नक्की!