
या निकालांनंतर ईव्हीएमबद्दल कुणीच काही बोललं नाही, ईव्हीएम जिंदा है ना…, या काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टोमण्याला काँग्रेसचे कर्नाटकमधील उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी आज खणखणीत प्रत्युत्तर दिले. काळजी करू नका, आमच्याकडे ईव्हीएम घोटाळ्याचे पुरावे आहेत. आम्ही आणखी पुरावे गोळा करतोय, ते घेऊन आम्ही लवकरच परत येऊ, असा जोरदार आवाज शिवकुमार यांनी मोदींना दिला.
निवडणुका जाहीर झाल्यापासून विरोधी पक्षांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणेबद्दल संशय व्यक्त करत भाजप आणि निवडणूक आयोगाला घेरले होते. या यंत्रणेच्या माध्यमातून मतमोजणीत गैरप्रकार होण्याची शक्यता व्यक्त करत काही संस्थांनी सुप्रीम कोर्टातही धाव घेतली होती. यामुळे ईव्हीएम यंत्रणेची सुरक्षा आणि मतमोजणीची प्रक्रिया पद्धती यात काही बदल करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. दरम्यान, ईव्हीएमवरून मोदींनी आज टीका केली. 4 जूनला निकाल येऊ लागल्यावर विरोधकांच्या तोंडाला कुलूप लागले… मला आशा आहे की, पुढील 5 वर्षे मला ईव्हीएम विरोधात कोणतीही तक्रार ऐकावी लागणार नाही, असे मोदी म्हणाले त्याला शिवकुमारयांनी प्रत्युत्तर दिले.
पुरावे गोळा करतोय
मोदींनी ईव्हीएमवरून विरोधकांवर केलेल्या टीकेचा शिवकुमार यांनी समाचार घेतला. विरोधक तुमच्या आरोपाला निश्चितपणे उत्तर देतील. इंडिया आघाडी याचेच पुरावे सध्या गोळा करत आहे आणि हे पुरावे घेऊन लवकरच आम्ही जाहीर करू, असे शिवकुमार यांनी पत्रकारांना सांगितले.
नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात एनडीएचा न्यू डेव्हलप्ड ऑस्पिरेशनल इंडिया असा फुलफॉर्म सांगितला. त्यावर काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी एनडीए म्हणजे नायडू/नितीश डिपेंडंट अलायन्स झालाय. गेली दहा वर्षे मोदी की गॅरंटी म्हणायचे. आता एनडीए की गॅरंटी म्हणू लागले, असा टोला हाणला.