आरटीई प्रवेशाची निवड आणि प्रतीक्षा यादी एकाच वेळ जाहीर होणार

शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत खासगी शाळांतील 25 टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठीची सोडत आज पुणे येथे पार पडली. या सोडतीचा निकाल 13 जून रोजी जाहीर होणार असून निवड यादी आणि प्रतीक्षा यादीवरील विद्यार्थ्यांची नावे एकाच वेळी सांगितली जातील, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.

पुणे येथे पार पडलेली सोडत विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. या वेळी राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसवी आदी उपस्थित होते. आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यावरील पुढील सुनावणी 12 जून रोजी होणार आहे. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर सोडतीचा निकाल 13 जून रोजी जाहीर होणार आहे. आरटीई अंतर्गत शाळा प्रवेशासाठी यंदा 2 लाख 47 हजार विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज कन्फर्म झाले असून पहिल्या फेरीत यापैकी 1 लाख 5 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे, प्रवेशफेरीचे पुढील नियोजन 12 जूननंतरच जाहीर करण्यात येईल.

सोडतीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत अशा रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या शाळा पसंतीक्रमानुसार प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश दिले जाणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले.

मुंबईतील आरटीईच्या 6265 जागांसाठी 9902 अर्ज

मुंबईतील 338 शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश होणार आहेत. या शाळांमधील एकूण 6265 जागांवर प्रवेश देण्यात येतील. या जागांसाठी एकूण 9902 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज आले आहेत. आज जाहीर झालेल्या सोडतीत यातील किती विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे हे 12 जूननंतर कळविण्यात येईल. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या प्रवेशाची स्थिती आरटीई प्रवेशाच्या वेबसाईटवरून घेता येईल. तसेच प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही कळविण्यात येईल.