फडणवीसांची दिल्लीत फडफड; शहांचा निरोप… आधी शपथविधी होऊद्या! मग तुमच्या राजीनाम्याचं बघू

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सपाटून मार खाल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फडफड सुरू झाली आहे. आपली बाजू मांडण्यासाठी त्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत पळापळ सुरू आहे. दिल्लीत आज झालेल्या एनडीएच्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांच्या निवास्थानी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तासभर खलबते केली. यानंतर पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहचलेल्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांना शहा यांनी आधी मोदींचा शपथविधी होऊ द्या, मग तुमच्या राजीनाम्याचे बघू, असे सांगत निरोप दिला.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा धक्कादायक पराभव झाला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीच्या झालेल्या या दारूण पराभवाची भाजप पक्षश्रेष्ठाRकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज्यातील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी फडणवीस यांनी दर्शविली आहे. संघ मुख्यालयातील वरिष्ठ पदाधिकार्यांच्या भेटीनंतर नागपूरहून थेट दिल्लीत पोहचलेल्या फडणवीस यांनी काल रात्री आणि आज दुपारी अशी दोन वेळा अमित शहा यांची भेट घेऊन लोकसभेतील पराभवाबाबत कारणमीमांसा करत आपले गार्हाणे मांडले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली. मात्र, शहा यांनी सध्या तुम्ही तुमचे काम सुरु ठेवा. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय करू, असे सांगितले.

उपमुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा
फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ केल्यानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांच्या नावाची उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू आहे. फडणवीस यांच्या नंतर महाजन यांनीही अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा आहे.

सरकार आणि संघटनेत बदलाचे संकेत
महाराष्ट्रात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा आराखडा तयार करू तोवर तुम्ही काम करत रहा, असा सल्ला अमित शहा यांनी फडणवीस यांना दिला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थिती सुधारण्यासाठी काही योजना अंमलात आणाव्या लागतील असे सांगत शहा यांनी सरकार आणि पक्षसंघटनेत बदलाचे संकेतही दिले आहेत.