
दक्षिण मुंबईतील 136 वर्षे जुना असलेला हेरिटेज दर्जाचा मलबार हिल जलाशय नव्याने बांधण्याचे टेंडर आता पालिका रद्द करणार आहे. हा जलाशय केवळ दुरुस्तीने सुस्थितीत येऊ शकतो असा अहवाल तज्ञ समितीने दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे मलबार हिलचे सुप्रसिद्ध हँगिंग गार्डन वाचणार आहे.
मलबार हिल जलाशयाला तब्बल 136 वर्षे झाल्यामुळे दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे. मात्र हा जलाशय नव्याने बांधायचा झाल्यास अनेक झाडांचा बळी जाणार होता. शिवाय या ठिकाणच्या मोकळय़ा जागेलाही फटका बसणार होता. त्यामुळे नागरिकांकडून नव्याने जलाशय बांधण्याच्या प्रकल्पाला विरोध केला जात होता.
ब्रिटिशकालीन जलाशयाचे महत्त्व
सध्याच्या फिरोजशाह मेहता उद्यानाच्या (हँगिंग गार्डन) खाली बांधलेल्या या जलाशयामार्फत कुलाबा, फोर्ट, सीएसएमटी, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, सँडहर्स्ट रोड, गिरगाव, काळबादेवी, मलबार हिल, नेपियन्सी रोड, ग्रँट रोड परिसरात पाणीपुरवठा केला जातो. पुनर्बांधणीनंतर दररोज सुमारे 150 दशलक्ष लिटरची क्षमता 190 दशलक्ष लिटरपर्यंत वाढवण्याची योजना होती.
कोटय़वधींच्या खर्चावरही होता आक्षेप
जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रकल्प 2017 मध्ये 185.94 कोटी इतका प्रस्तावित होता. मात्र तो आता 700 कोटींवर पोहचला होता. शिवाय मलबार हिल जलाशयाच्या 5 टाक्यांची जलधारण क्षमता एकूण 147.78 दशलक्ष लिटर असताना त्यामधील केवळ 79.73 दशलक्ष लिटर पाणीसाठाच वापरला जातो, मग नवीन जलाशयाच्या पुनर्बांधणीचा घाट पालिका प्रशासनाने का घातला, असा प्रश्न पुनर्बांधणीला विरोध करणाऱया स्थानिकांनी उपस्थित केला होता. नवीन टाकीसाठी हँगिंग गार्डन परिसरातील तब्बल 393 झाडांची कत्तल होणार होती.