आघाडी सरकार चालवायला मोठे मन, सर्वसमावेशक दृष्टिकोन लागतो, गोगोई म्हणाले, पंतप्रधान म्हणून मोदींचे भविष्य अनिश्चित

एनडीएतील घटक पक्षांच्या हातापाया पडून नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची माळ गळय़ात घालून घेण्यासाठी लगबग चालवली आहे. मात्र, काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी मोदी यांना त्यांच्या लगीनघाईवरून चांगलेच टोलवले आहे. आघाडी सरकार चालवण्यासाठी मोठय़ा मनाची, खुल्या मनाची आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनाची गरज असते. यामुळे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे भवितव्य अनिश्चितच दिसतेय, असे सांगत गोगोई यांनी मोदींच्या उणिवांवर बोट ठेवले आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्यात हे सर्वसमावेशक नेतृत्वाचे गुण होते, पण मोदींकडे ते आहेत असे मला वाटत नाही. त्यामुळे पंतप्रधान म्हणून त्यांची दीर्घकालीन कारकीर्दीची शक्यता शंकास्पद आहे, असे गोगोई यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. नवनिर्वाचित काँग्रेस खासदारांचा नवी दिल्लीतील पक्षाच्या राज्य मुख्यालयात सत्कार करण्यात आला, या वेळी ते बोलत होते.

गोगोई यांनी चुरशीच्या निवडणुकीत भाजपचे टोपोन गोगोई यांना जोरहाट लोकसभा मतदारसंघात मात दिली आहे. राहुल गांधींना पंतप्रधानांपेक्षा मोठय़ा उंचीवर नेण्यासाठी उत्तर प्रदेशातील लोकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

न्याय यात्रेचा मोठा प्रभाव

भारत जोडो न्याय यात्रेचा देशभरात निर्विवादपणे महत्त्वपूर्ण प्रभाव पडला. भाजपचे प्रभावक्षेत्र मानले जाणाऱया यूपी, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या हिंदी पेंद्रस्थानी असलेल्या राज्यांमधील मतदानाच्या घसरणीवरून हेच स्पष्ट होते. यात्रेचा चांगला परिणाम ईशान्येकडील राज्यांतही जाणवला. मणिपूरमध्ये काँग्रेसने दोन जागा जिंकल्या, त्यानंतर नागालँड आणि मेघालयमध्ये प्रत्येकी एक जागा आणि आसाममध्ये तीन जागा जिंकल्या याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

जर आपण उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि वाराणसीतील मताधिक्याची तुलना केली तर जिथे भाजपचा दावा आहे की, त्यांचे ‘डबल इंजिन सरकार’ राज्याची भरभराट करत आहे. तिथे तर राहुल गांधींनी मोदींच्या विजयाच्या दुप्पट फरकाने विजय मिळवला आहे याकडे गोगोई यांनी लक्ष वेधले. सध्या मला मोदी पाच वर्षे पंतप्रधानपदी टिकतील का हीच शंका वाटतेय. कारण, उत्तर प्रदेशातील मतदारांनी वाराणसीत त्यांच्या मतदानातून त्यांची नापसंती दर्शवली आहे, असा दावा गोगोई यांनी केला.