बारामतीत लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती आहे. प्रचारा दरम्यान फिरताना त्याचा प्रत्यय आला. ही भीती दूर करण्याचे काम यापुढील काळात केले जाईल, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
सलग चौथ्यांदा खासदार झाल्यानंतर बारामतीत त्यांचा सत्कार पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, जवाहर वाघोलीकर, सतीश खोमणे, पौर्णिमा तावरे, एस. एन. जगताप, संदीप गुजर, सत्यव्रत काळे, वनिता बनकर, प्रशांत बोरकर, प्रा. रवींद्र टकले, आकाश मोरे, वीरधवल गाडे यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, या देशात दडपशाही चालणार नाही. या देशात लोकसभेचा लागलेला निकाल जाहीरपणे असे सांगतो की, या देशाने दडपशाही नाकारली आहे. मी अखिलेश यादव यांची भेट घेतली. त्यांना विचारले की 40 खासदार कसे निवडून आणले. तेव्हा ते म्हणाले की, सत्ताधाऱयांना जनतेचे दुःखच समजले नाही. शेतकऱयांवर लाठी चार्ज, शेतकऱयांच्या मालाला हमीभाव दिला नाही. बेरोजगारी, महागाई या विषयावर कोणी बोलतच नाही.
निवडणूक प्रचार काळात शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित व्यापारी मेळावा ऐनवेळी व्यापाऱयांनी रद्द करत असल्याचे पत्र दिले. त्यानंतर दुसरी व्यापारी संघटना उभी राहिली त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा घेतला. तदनंतर मात्र पहिल्यांदा रद्द झालेला मेळावाही पार पडला. त्यावेळच्या घटनेमुळे मला दुःख झाले होते. कोणत्या ना कोणत्या कारणाने व्यापाऱयांना तो मेळावा रद्द करावा लागला असेल पण त्याच व्यापाऱयांनी काही न बोलता मला भरभरून मतदान केले, असे सुळे म्हणाल्या.
सुडाचे राजकारण कधीही केले नाही
लोकसभा निवडणुकीच्या काळात अत्यंत वेगळ्या पद्धतीचे वातावरण होते. पण आपण प्रामाणिक काम केले. झाले गेले गंगेला मिळाले. शरद पवार यांनीही कधी सूडाचे राजकारण केले नाही. आपणही ते करणार नाही असे त्या म्हणाल्या.
दहशत निर्माण केली
मतदारसंघातील दोन व्यक्तींनी दहशत निर्माण केली होती. त्यांनी गावोगावी, खेडोपाडी जात कार्यकर्त्यांना धमकावण्याचे काम केले, असे सांगून सुळे म्हणाल्या, त्यांनी जर पुन्हा कुठल्याही कार्यकर्त्याला धमकी दिली, तर मी तुमच्या पाठीशी ठाम असेन.