दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ’गंभीर’ आर्थिक गुह्यांशी जोडण्यासाठी ’पुरेसे पुरावे’ असल्याचे सांगत ईडीने शुक्रवारी कथित अबकारी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात नियमित जामीनासाठी केजरीवाल यांनी केलेल्या अर्जाला विरोध केला. केजरीवाल यांच्याविरुद्ध आमच्याकडे अनेक ठोस पुरावे आहेत, असे ईडीने विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांना सांगितले. यानंतर अर्जावर पुढील युक्तिवादासाठी न्यायमूर्तींनी 14 जूनची तारीख दिली आहे. दरम्यान, कथित अबकारी घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी दिल्ली न्यायालयात बीआरएस नेत्या के कविता यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात कविता यांच्यावर खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत, असा दावा सीबीआयने विशेष सीबीआय न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर केला. न्या. बावेजा यांनी पुढील सुनावणीसाठी 6 जुलै ही तारीख दिली आहे. तत्पूर्वी, कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत 21 जूनपर्यंत आज वाढ करण्यात आली.