>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
कश्मीरला 2022 मध्ये 1.88 कोटी पर्यटकांनी भेट दिली, जे गेल्या 75 वर्षांतले सर्वात मोठे रेकॉर्ड आहे. 2023 मध्ये 2.11 कोटी पर्यटकांनी कश्मीरला भेट दिली होती. कश्मीरमध्ये पर्यटन वाढले हे चांगले असले तरी पर्यटकांना लुटण्याचे आणि लुबाडण्याचे प्रकारही वाढत आहेत. ही चिंतेची बाब आहे. टुरिस्ट टॅक्सी, कश्मीरचे पोलीस, तिथले हॉटेलचे मालक यांच्यामध्ये संगनमत असते. ज्यामुळे पर्यटकांचा गैरफायदा उठवण्यात येतो. हे कश्मीर सरकारने थांबवायलाच पाहिजे.
भारतामध्ये प्रेक्षणीय स्थळे भरपूर आहेत, परंतु अनेक ठिकाणी जाण्याचा मार्ग कठीण आहे. एक तर विमानाचे भाडे खूपच जास्त आहे. परदेशात विमानाने जाणे जास्त स्वस्त आहे. याशिवाय पर्यटन स्थळात असलेली हॉटेल्स विनाकारण किमती वाढवून पैसे लुटतात. पर्यटन स्थळी पोचल्यानंतर सुरक्षा व्यवस्था फारशी मजबूत नाही, याचा अनुभव येतो. पर्यटकांना त्रास देणारे अनेक जण असतात. जसे की भिकारी, तथाकथित गाईड, घोडेवाले आणि इतर अनेक. पोलिसांची संख्या वाढली पाहिजे.
पर्यटन स्थळांमध्ये अनेक सुधारणा व्हायला पाहिजेत. बहुतेक पर्यटन स्थळे ही अत्यंत गलिच्छ असतात आणि तिथे रोज साफसफाईची गरज आहे. उदाहरण म्हणजे कश्मीरमधले दल लेक, ज्याचे पाणी अत्यंत गलिच्छ आहे, कारण श्रीनगरचे सगळे सांडपाणी या तलावात सोडले जाते. या भागात घोडय़ावरून जायचे दर, लोकल टॅक्सीचे दर हे फारच जास्त आहेत. स्त्रियांकरिता कुठेही स्वच्छतागृहे दिसत नाहीत आणि असतील तर ती गलिच्छ असतात.
सोनमर्ग-कारगिल रस्त्यावर प्रवास करताना आम्हाला सैन्यातील मित्रांकडून बातमी मिळाली की, एक मोठी दरड कोसळली आहे आणि रस्ता बंद पडला आहे आणि दोन दिवस रस्ता बंदच राहील. म्हणून आम्ही मागे फिरलो. मात्र त्याच वेळेला मी स्वतःच्या डोळ्याने हजारो गाडय़ा याच रस्त्यावर कारगिलला पुढे जाताना बघितल्या. हे मुद्दाम केले जात असावे, कारण एक दीड तास प्रवास केल्यानंतर, त्या गाडय़ा अडकणार होत्या. रस्ता बंद झाल्यामुळे रस्त्यात असलेल्या हॉटेल्सचे दर, जेवणाचे दर जास्त वाढवलेले होते. याशिवाय या पर्यटकांना परत यावेच लागले तर राहायला सोनमर्ग किंवा श्रीनगरशिवाय दुसरा कुठला पर्याय नव्हता. तिथे पण हॉटेलचे दर हे वाढवण्यात आले होते.
मुद्दा असा आहे की, दरड कोसळल्याची बातमी मिळाल्यानंतर या पर्यटकांना सुरुवातीलाच का थांबवण्यात आले नाही? त्यांना मुद्दाम पुढे जाऊन त्रासाचा सामना करायला लागला आणि दुप्पट किंवा तिप्पट पैसा खर्च का करावा लागला? म्हणजेच टुरिस्ट टॅक्सी, कश्मीरचे पोलीस, तिथले हॉटेलचे मालक यांच्यामध्ये संगनमत असते. ज्यामुळे पर्यटकांचा गैरफायदा उठवण्यात येतो. हे कश्मीर सरकारने थांबवायलाच पाहिजे. हे उदाहरण मी जास्त विस्तृतरीत्या सांगितले आहे. कारण अशाच प्रकारचा त्रास हा डोंगराळ भागांमध्ये होत असतो. मग ते कश्मीर असो की हिमाचल प्रदेश की चारधामच्या यात्रा किंवा उत्तरेकडे असलेली वेगवेगळी डोंगरातली पर्यटन स्थळे.
काही ठिकाणी मध्ये असलेली गावे विनाकारण टुरिस्ट गाडय़ांकडून लोकल टॅक्स वसूल करतात, हे सरकारने मान्य केले आहे काय? जम्मू-श्रीनगर-सोनमर्ग-कारगिल रस्त्यावरती जास्त पेट्रोल पंप आणि स्वच्छतागृहांची गरज आहे. या रस्त्यावरती स्नॅक बार्स म्हणजे हॉटेल्सची अत्यंत कमी आहे, जी आरामात पुरी केली जाऊ शकते. लोकल गाईड, घोडेवाले ,टॅक्सीवाले यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड असावे आणि रेट कार्डसुद्धा दिले जावे, यामुळे पर्यटकांची फसवणूक होणार नाही. एअरपोर्टवर चेकइन जास्त वेगवान करणे गरजेचे आहे. तिथे पुरेसे ट्रे मिळत नाहीत, रांगा खूप लांब असतात, स्पॅन करणारे सीआयएसएफ अतिशय ढिल्या पद्धतीने काम करतात.
महिन्यातून एक-दोनदा तरी कश्मीर खोऱयामधले दहशतवादी बाहेरून येणाऱया ड्रायव्हर्स किंवा पर्यटकांवरती हल्ला करतात. गेल्या दोन महिन्यांमध्ये कश्मीर खोऱयात पाच बाहेरचे नागरिक दहशतवाद्यांकडून मारले गेले. रोड अपघातात मरणाऱया पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. हे थांबवले पाहिजे.
कश्मीर खोऱ्याचे भारतीयीकरण
अर्थातच सगळेच वाईट आहे असे नाही. काही काही चांगले अनुभवसुद्धा येतात. पर्यटक प्रचंड प्रमाणामध्ये कश्मीरमध्ये यायला लागल्यामुळे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ, गुजराती खाद्यपदार्थ, साऊथ इंडियन खाद्यपदार्थ हे आता कश्मीरमधल्या बहुतेक हॉटेल्समध्ये मिळू लागले आहेत. श्रीनगरच्या आत अनेक हिंदू हॉटेल्स दिसतात, जे याआधी अशक्य होते. मोठय़ा प्रमाणामध्ये पर्यटक कश्मीर खोऱयामध्ये प्रवास करताना दिसतात. अर्थात कश्मीर खोऱयामध्ये जुनी किंवा प्राचीन मंदिरे अनेक आहेत. आता त्या मंदिरांचे पुनर्वसन केले जात आहे, ज्यामुळे तिथे जाणाऱया टुरिस्टची संख्यासुद्धा वाढत आहे. यामुळे कश्मीर खोऱयाचे भारतीयीकरण होत आहे. या भागामध्ये पर्यटन सुविधांचा अजून विकास करणे आवश्यक आहे. यामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन मार्गदर्शक, वाहतूक व्यवस्था इत्यादींचा समावेश होतो. पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे. यामुळे पर्यटन सुविधांमध्ये सुधारणा होईल आणि पर्यटनाचा विस्तार होईल. यासाठी पर्यटन व्यवसायाशी संबंधित संस्था आणि संघटनांना प्रोत्साहन दिले पाहिजे. सीमावर्ती भागातील पर्यटनाचे नियोजन करणे आवश्यक आहे. या भागात सैन्यामुळे सुरक्षा व्यवस्था सुधारली आहे. सैनिकांनी स्थानीय जनतेला आपले बनवले आहे आणि स्थानीय आरोग्य यंत्रणाची मदत केली आहे. बॉर्डर टुरिझम पर्यटनमुळे लाखो नोकऱया निर्माण झाल्यामुळे, त्याचा लाभ सीमावर्ती भागातल्या आणि इतर दुर्गम भागातल्या जनतेला मिळत आहे. एकेकाळी कश्मीरमध्ये असलेल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे भारतीय सिनेमांची शूटिंग कश्मीरमध्ये होत. ते थांबले होते. पण आता या शूटिंगचे पुनरुज्जीवन होत आहे आणि आतापर्यंत 400 वेगवेगळ्या सिनेमा प्रॉडक्शन हाऊसला कश्मीरमध्ये शूटिंग करण्याकरिता परवानगी मिळालेली आहे. कश्मीरमध्ये 2024 मध्ये येणाऱया पर्यटकांची संख्या दोन कोटी पन्नास लाखाहून जास्त होण्याची शक्यता आहे. या वाटचालीमध्ये भारतीय सैन्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती आणि येणाऱया काळातदेखील राहणार आहे.