राहुल गांधी यांना दिलासा; बंगळुरू न्यायालयाकडून जामीन मंजूर, नक्की प्रकरण काय?

काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मानहानी प्रकरणात बंगळुरूतील एका न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी शुक्रवारी सकाळी राहुल गांधी बंगळुरुत दाखल झाले होते. हे सर्व प्रकरण कर्नाटक विधानसभा निवडणुकी वेळचे आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी कर्नाटकच्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात छापून आली होती. यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तत्कालिन भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. यावर कर्नाटकातील भाजप नेत्यांनी आक्षेप घेत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता.

या खटल्यात काँग्रेस पक्ष, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि खासदार राहुल गांधी यांना आरोपी बनवण्यात आले होते. सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांना या खटल्यात 1 जून रोजीच जामीन मंजूर करण्यात आला होता. याच प्रकरणात राहुल गांधी आज बंगळुरुतील न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांनाही जामीन मंजूर केला. यावर पुढील सुनावणी आता 30 जुलै रोजी होईल.