भाजपच्या पराभवानंतर अयोध्यावासियांना शिवीगाळ करणारा दक्ष चौधरी अटकेत, कन्हैय्या कुमारवरही केलेला हल्ला

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात बसला. या दोन्ही राज्यात मिळून भाजपच्या जवळपास 50 जागा कमी झाल्या. त्यामुळे भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही आणि नितीश कुमार, चंद्राबाबू यांचा टेकू घेऊन सरकार स्थापन करण्याची वेळ आली.

उत्तर प्रदेशमधील अनेक महत्त्वाच्या जागांवर भाजपला विजय मिळवण्यात अपयश आले फैजाबाद लोकसभा जागेवरही भाजपला पराभूत व्हावे लागले. याच मतदारसंघात अयोध्याही येते. मात्र तरीही भाजपला पराभूत व्हावे लागल्याने अयोध्यावासियांना हिंदू रक्षा दलाचा कंटेंट क्रिएटर दक्ष चौधरी याने शिवीगाळ केली होती. आता त्याच्यासह अन्य एकाला गाझियाबाद पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे याच दक्ष चौधरी याने दिल्लीतील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार याच्यावरही हल्ला केला होता.

फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार पराभूत झाला. येथून समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद यांनी 55 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. याच मतदारसंघात अयोध्याही येते, मात्र मंदिर उभारणीनंतरही भाजपचा पराभव झाल्याने हिंदू दक्ष दलाच्या दक्ष चौधरी याने अश्लाघ्य भाषेत अयोध्यावासियांना शिवीगाळ आणि दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे विधान केले होते.

पोलीस अधिकारी सिद्धार्थ गौतम यांनी दक्ष चौधरीच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल व्हिडीओमुळे दोन धर्मात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच यात अश्लाघ्य शब्दात टीका करण्यात आली आहे. त्यामुळे याची दखल घेत टिला मोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, असे गौतम यांनी सांगितले.

दरम्यान, दक्ष चौधरी याने उत्तर-पूर्व दिल्लीचा काँग्रेस-इंडिया आघाडीचा उमेदवार कन्हैय्या कुमार याला कानफटावले होते. निवडणूक प्रचारासाठी निघालेल्या कन्हैया कुमारला हार घातल्यानंतर त्याच्या कानाखाली मारण्यात आली होती. याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर फैजाबाद जागा गमावल्याने व्यथित होत दक्षने अयोध्यावासियांना शिवीगाळ केली.

आरोपी दक्ष चौधरी गोरक्षक असल्याचा दावा करतो. तसेच ऑनलाईन कपड्यांचा व्यवसायही आहे. तर दुसरा आरोपी अन्नू चौधरीही गोरक्षक आहो. दोघेही दिल्लीत राहतात. येथे ते 3-4 गोशाळाही चालवतात. दक्ष चौधरी याचे सोशल मीडियावर 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या दोघांनाही पोलिसांनी तेढ निर्माण होईल असे विधान केल्याने अटक करण्यात आली आहे.