Breaking संसदेची सुरक्षा भेदण्याचा पुन्हा प्रयत्न; बनावट आधारकार्डावर परिसरात शिरू पाहणारे 3 अटकेत

उत्तर प्रदेशातील तीन जणांनी बनावट आधार कार्ड वापरून कडक सुरक्षा असलेल्या संसदेच्या संकुलात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना अटक करण्यात आली.

दिल्ली पोलिसांनी कासिम, मोनिस आणि सोएब या तीन आरोपींना बनावट कागदपत्र आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली. सुरक्षा तपासणीसाठी रांगेत उभे असताना या तिघांना मंगळवारी संसद भवनाच्या फ्लॅप गेट एंट्रीवर सीआयएसएफच्या जवानांनी रोखले आणि ताब्यात घेतले.

आरोपींनी त्यांचे आधार कार्ड सीआयएसएफच्या जवानांना सादर केले असता त्यांना कागदपत्रे संशयास्पद वाटली. ही कार्डे अधिक छाननीसाठी पाठवली असता ती बनावट असल्याचे आढळून आले.

त्यांना डी वी प्रोजेक्ट्स लिमिटेडने करारावर घेतले होते आणि ते संसदेच्या संकुलात खासदारांच्या विश्रामगृहाच्या बांधकामाचे काम पाहात होते, असे तपासात समोर आले आहे.

तीन आरोपींना सीआयएसएफ कर्मचाऱ्यांनी दिल्ली पोलिसांकडे सोपवले आणि कलम 465, कलम 419, कलम 120बी, कलम 471 आणि कलम 468 यासह आयपीसीच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला.

CISF ने अलीकडेच CRPF आणि दिल्ली पोलिसांच्या तुकड्या बदलून संसदेच्या संकुलाची संपूर्ण सुरक्षा आपल्या ताब्यात घेतली.