दुर्देवी घटना ! रशियात जळगावच्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

drowned

रशियातील सेंट पीटर्सबर्ग जवळील नदीत जळगावातील तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तीन विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी आहेत. तर तिसरा विद्यार्थी भडगाव येथील असल्याची माहिती आहे. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीदेखील या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

मृत विद्यार्थी रशियातील सेंट पीटर्सबर्गमधील रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. 4 जून रोजी संध्याकाळी सेंट पीटर्सबर्ग जवळ असलेल्या वोल्खोव्ह या नदीच्या किनारी हे पाच मित्र फेरफटका मारायत गेले होते. त्याचवेळी एकमोठी लाट आली आणि ते पाचही जण नदीत ओढले गेले आणि बुडाले. मात्र पाच जणांपैकी चौघांचा नदीत बुडून मृत्यू झाला, तर एकाला वाचवण्यात यश आलं आहे. मृत्यू झालेले तिघे जळगाव जिल्ह्यातील आहेत. जिया फिरोज पिंजारी, जी शान अशपाक पिंजारी आणि हर्षल देसले अशी जळगाव जिल्ह्यातील मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तिघांपैकी हर्षल देसले या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला असून इतर विद्यार्थी अद्याप बेपत्ता असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

रशिया येथील प्रशासन आणि पोलीस यांच्यावतीने हिंदुस्थानच्या दूतावासाला या घटनेबाबत कळविण्यात आले आहे. हिंदुस्थानच्या दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना माहिती कळवून मृत विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला आहे. हर्षल देसले या विद्यार्थ्यांचा मृतदेह हिंदुस्थानात पाठवण्यासाठी रशियाची कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे. सध्या रशियन फेडरेशनमधील सर्व संबंधित एजन्सीं पुढील कार्यवाही करत आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने विदेश मंत्रालयाशी संपर्क करून रशियातील हिंदुस्थानी दुतावासातील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क केला. हिंदुस्थानच्या दुतावासाने संबंधित विद्यापीठाशी संपर्क करून माहिती जाणून घेतल्याचे सांगितले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.