बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठय़ा मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात आल्यानंतर सुप्रिया सुळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सुप्रिया सुळेंवर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण आणि गुलाल उधळून ढोल-ताशाच्या गजरात सुप्रिया सुळेंच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.
सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना उद्देशून घोषणाबाजीही करण्यात आली. दादाला सांगा ताई आली… वहिनींना सांगा ताई आली… चंपाला सांगा ताई आली असे म्हणत समर्थकांनी जल्लोष केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव काsंढरे, पुणे जिल्हा महिलाध्यक्षा भारती शेवाळे, पुणे शहर महिलाध्यक्षा मृणालिनी वाणी, पुणे शहर युवकाध्यक्ष किशोर कांबळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधत मतदारांचे आभार मानले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यातील महाविकास आघाडीचा विजय हा मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. मी आणि आमदार रोहित पवार शुक्रवारपासून बारामती मतदारसंघातील दुष्काळी पाहणी दौरा करणार आहोत.
सुनेत्रा वहिनींबद्दल माझ्या मनात आदरच
विजयानंतर शुभेच्छांसाठी सुनेत्रा वहिनींचा फोन आला का, या पत्रकारांच्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, ‘त्या माझ्या मोठय़ा वहिनी आहेत. त्या वयाने, नात्याने आणि पदाने माझ्यापेक्षा मोठय़ा आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये नेहमी प्रेम आणि आदरच राहील.