महाराष्ट्र किनारपट्टीवरील समुद्री कासवांच्या मृत्यूची वितरण आणि विगतवारी अधोरेखित करणारा नकाशा एक महत्वपूर्ण अहवाल हम्दर्याद या मुक्त प्रवेश जैविक विज्ञान नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला आहे. प्राची हाटकर, प्रियम्वदा बगारिया, दिनेश विन्हेरकर, सागर पटेल, आणि दिवंगत धवल कंसारा यांनी केलेल्या या संशोधनात संवर्धनासाठी केलेले प्रयत्न आणि कासवांसाठी धोकादायक असलेली संभावित स्थाने (हॉटस्पॉट्स) जिथे समुद्री कासवे मरून/ जखमी होऊन अडकून पडू शकतात, अशा घटकांचा अभ्यास या अहवालात देण्यात आला आहे.
सर्व समुद्री कासवांना वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची एक अंतर्गत संरक्षण दिले जाते, ज्यामुळे त्यांना भारतात सर्वात उच्च स्तराचे संरक्षण प्राप्त होते. सध्याच्या अभ्यासात 1981 ते 2021 या 40 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र किनारपट्टीवरील कासवांच्या मृत्यूंच्या आकड्यांबाबत संशोधन करून तपशील तपासण्यात आला. एकूण 510 कासवांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली, ज्यामुळे संशोधकांना कासवांच्या मृत्युमागील स्थानिक आणि हंगामी कारणे ओळखता आली आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या घटकांचे आकलन झाले. या अभ्यासात नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित घटक कासवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारणांचे वर्गीकरण करून, या संशोधनाने उपाययोजनांची आवश्यकता अधोरेखित केली आहे. समुद्री कासवांचे मृत्यू रोखण्यासाठी संबंधित ठिकाणं आणि त्या काळात मानवी हस्तक्षेपाला बंदी घालून हे प्रमाण कमी करता येऊ शकेल असंही यात नमूद करण्यात आलं आहे.
समुद्री कासवांचे सर्वाधिक मृत्यू हे पावसाळ्यात होतात. मासेमारी तसंच समुद्राला आलेल्या उधाणामुळे मृत्यू होई शकतात. त्यापैकी ऑलिव्ह रिडले ही प्रजाती संवेदनशील प्रजाती म्हणून ओळखली जाते. संशोधनातील सर्वाधिक म्हणजे 360 मृत्यू हे याच प्रजातीचे असून, त्याखालोखाल 127 मृत्यू हे ग्रीन सी या कासवांचे आहेत. हॉकस्बिल या प्रजातीच्या 16 तर लॉगरहेड या प्रजातीच्या 5 तसंच, राज्याच्या किनारपट्टीवर दुर्मीळ असणाऱ्या लेदरबॅक प्रजातीतील 3 कासवांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यातील बहुंताश मृत्यू हे विणीच्या हंगामात किंवा अंडी घालून समुद्र किनाऱ्यावर परतत असताना झाल्याचं निरीक्षणही नोंदवण्यात आलं आहे. अशा प्रकारे अडकलेल्या सुमारे 54.8 टक्के कासवांना वाचवण्यात आणि त्यांची सुटका करण्यात डहाणू वन विभागाचे कर्मचारी, स्थानिक एनजीओ, पर्यावरण स्वयंसेवक आणि स्थानिक समुदायांचा मोठा हातभार असल्याचंही या अहवालात देण्यात आलं आहे.
या चारही जणांच्या अभ्यासात जिल्हा चिखले समुद्रकिनारा (पालघर जिल्हा) (32), निवती समुद्रकिनारा (सिंधुदुर्ग जिल्हा) (25), चिंचणी समुद्रकिनारा (पालघर जिल्हा) (23), जुहू समुद्रकिनारा मुंबई (23), वेंगुर्ला समुद्रकिनारा (सिंधुदुर्ग जिल्हा) (21), आणि धाक्ती डहाणू समुद्रकिनारा (पालघर जिल्हा) (18) येथे सर्वाधिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
त्यानंतर खवणे (14), बोर्डी समुद्रकिनारा ठाणे जिल्हा (12) आणि दांडी समुद्रकिनारा पालघर जिल्हा (17) आहेत. बहुतांश कासवं विविध मच्छीमारी जाळ्यांमध्ये पकडले जातात, ज्यामध्ये डोल नेट्स जाळे, हुक अँड लाइन्स , गिलनेट्स, बॅग नेट्स, राम्पानी जाळे, आणि भूत जाळे यांचा समावेश आहे. अशा प्रकारे मासेमारी करताना माश्यांसह अनेक अन्य समुद्री जीवही जाळ्यात सापडतात आणि मृत्युमुखी पडतात. अशा जिवांच्या हानीमुळे पर्यावरणाला भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. त्यांच्या संरक्षणासाठी धोरणात्मक उपाययोजनांची गरज असल्याचंही अहवालात म्हटलं आहे.
“आमच्या अहवालात महाराष्ट्र किनारपट्टीवरील समुद्री कासवांच्या मृत्यूचे एक सर्वांगीण अवलोकन करण्यात आलं आहे. त्यात कासवांच्या मृत्युंमागील कारणे आणि त्यासंदर्भातील इतर घटक, समुद्री कासवांचे संवर्धन, त्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि धोरणात्मक बदल यांचा उहापोह करण्यात आला आहे, अशी माहिती अहवालात योगदान असणाऱ्या लेखिका प्राची हाटकर यांनी दिली आहे.
समुद्री कासवांचे महत्त्व –
समुद्री कासव समुद्राच्या परिसंस्थेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतात. ते समुद्री गवताच्या कुरणांचे आणि प्रवाळ भित्तींचे आरोग्य राखण्यात मदत करतात, पोषक तत्वांचे सायकलिंग सुलभ करतात आणि इतर सागरी जीवांसाठी आश्रयस्थाने प्रदान करतात. कासवांच्या संख्येत घट झाल्याने, त्यांच्या या महत्वपूर्ण भूमिकांची कार्यक्षमता कमी होते, ज्यामुळे महासागरांचे एकूण आरोग्य प्रभावित होते. कासवांच्या लोकसंख्येचे पुनरुज्जीवन सुनिश्चित करणे हे सागरी परिसंस्थेचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे.